भारतात खाद्य तेलाच्या किमती भडकणार? कारण जाणून घ्या !

Will edible oil prices rise in India? Know the reason!

नवी दिल्ली : इंडोनेशियाकडून खाद्य तेलाच्या सर्व निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचा भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

यामुळे भारतातील तेलाचे भाव आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच रशिया-युक्रेन युद्धामुळे सुर्यफूलाचे तेल आणि इतर तेलाच्या किंमतीत वृद्धी झाली आहे. असे असताना इंडोनिशियाच्या या निर्णयामुळे भारत पुन्हा संकटात येण्याची शक्यता आहे.

इंडोनिशियाने स्थानिक महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच तेलाची टंचाई आणि कच्च्या मालाच्या सर्व निर्यातीवर बंदी घातली आहे. इंडोनेशिया पाम तेलाचा मोठा निर्यातदार देश आहे.

२८ एप्रिलपासून सर्व शिपमेंट्स थांबवण्याचे निर्देश इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी दिली आहे. मात्र टंचाईवर मात झाल्यास आणि महागाई नियंत्रणात आल्यास पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

इंडोनेशियाकडून देशातील वाढत्या महागाईशी लढण्यासाठी पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. भारतात पाम तेलाचा वापर जास्त प्रमाणात होतो.

डिझेल-पेट्रोलमध्ये मिसळलेल्या जैव-इंधनात देखील पाम तेलाचा वापर केला जातो. जगभरातील सुमारे ५० टक्के घरगुती उत्पादनांमध्ये पाम तेलाचा वापर होतो.

शाम्पू, आंघोळीचा साबण, टूथपेस्ट, व्हिटॅमिनच्या गोळ्या, मेकअपच्या वस्तू इत्यादींमध्येही पाम तेलाचा वापर केला जातो. यामुळे इंडोनेशियाच्या या निर्णयाचा फटका जगभरात बसण्याची शक्यता आहे.

इंडोनेशियाच्या निर्णयाचा भारताकडून विरोध

भारतीय व्यापा-यांकडून इंडोनेशियाच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे. हा निर्णय पूर्णपणे दुर्दैवी असल्याचे बोलले जात आहे. पाम तेल जगात सर्वाधिक विकले जाणारे तेल आहे.

जानेवारीत देखील आणली होती बंदी

याआधी जानेवारी महिन्यात देखील इंडोनेशियाने पाम तेल निर्यातीवर बंदी आणली होती. मात्र नंतर मार्चमध्ये बंदी हटवण्यात आली होती.

निर्णयावर राष्ट्रपती लक्ष ठेवणार

इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी म्हटले आहे की, मी या निर्णयाच्या अमलबजावणीबाबत स्वत: लक्ष ठेवणार आहे. सोबतच या निर्णयाचे मूल्यांकनदेखील केले जाईल.

देशात खाद्यतेलाची उपलब्धता व्यवस्थित व्हावी आणि किमती स्थिर राहाव्यात यासाठी हा निर्णय घेतला आहे. इंडोनेशियात लोक महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. अशा वेळी हा घेण्यात आला आहे यामुळे लोकांचा रोष कमी होईल असे तिथल्या सरकारला वाटत आहे.