सीएम ठाकरेंची पीएम मोदींच्या पुरस्काराकडे पाठ; शिवसैनिकांसाठी घेतला निर्णय

CM Thackeray's back to PM Modi's award; Decision taken for Shiv Sainiks

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणारा पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा आज (२४ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता षण्मुखानंद हॉल, मुंबई येथे होणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मोदी स्वतः उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान मोदींसोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे असे सर्व नेते एकाच व्यासपीठावर येणार होते.

मात्र आता या सोहळ्याकडे मुख्यमंत्री ठाकरे पाठ फिरवणार असल्याची माहिती आहे. लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याला उद्धव ठाकरे अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.

शिवसैनिकांच्या लढ्याचा अपमान म्हणून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच हा पुरस्कार सोहळा सरकारी कार्यक्रम नसून खाजगी कार्यक्रम आहे. त्यामुळे या पुरस्कार सोहळास शिष्टाचाराचे बंधन नाही.

गेल्या काही दिवसांपासून  केंद्रीय तपास यंत्रणावर झालेला हल्ला, राणा दाम्पत्य संघर्ष, भाजप नेते मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांच्यामुळे शिवसेना आणि भाजप असा संघर्ष मुंबईच्या रस्त्यावर पाहायला मिळत आहे.

या संपूर्ण घटनेदरम्यान शिवसैनिकांनी आपला जीव धोक्यात घालून मातोश्री आणि ठाकरे कुटुंबीयांच्या रक्षणासाठी रात्रंदिवस आंदोलन केले.

या शिवसैनिकांच्या संघर्षाचा अपमान होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर न जाण्याचा निर्णय घेणार असल्याचे कळते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला मुख्यमंत्री ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतकेच नाही तर त्यांच्या स्वागताला शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे जाणार नसल्याचे बोलले जात आहे.

राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जाणार आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडी पाहता मोदी आणि ठाकरे यांच्यातील दरी वाढली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.