मुंबई, 04 ऑगस्ट : शिवसेनेविरोधात बंडखोरी करत शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. परंतु, महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
मात्र आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. सुप्रीम कोर्टाने 8 ऑगस्टला पुढील सुनावणी निश्चित केली आहे. त्यामुळे निर्णय लांबणीवर पडणार आहे.
शिवसेनेच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय दिलेला नाही. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय न घेण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच, दोन्ही गटांच्या लेखी युक्तिवादावर निर्णय घेतला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे हा निर्णय पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे जाणार की नाही, याबाबत सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे शिंदे गटात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होणार आहे. मात्र, त्याआधीच मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी समोर आली आहे.
भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे, बबनराव लोणीकर यांना मंत्रिपद दिले जाणार आहे.
तर शिंदे गटातून शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावे पुढे आली आहेत. शिवसेनेत जे मंत्री होते त्यांनाच मंत्रीपदे दिली जात आहेत.
मंत्रिमंडळ विस्ताराचा 60/40 फॉर्म्युला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला 15 ते 16 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजप गृह खाते स्वतःकडे ठेवणार आहे. 60-40 हे मंत्रिमंडळ विस्ताराचे सूत्र आहे.
या विस्तारात शिवसेनेच्या शिंदे गटातील अनेक आजी-माजी मंत्र्यांना वेटिंगवर ठेवले जाणार आहे, त्यामुळे इच्छा असली तरी काही जणांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. या शपथविधी सोहळ्याला केंद्रातील भाजप नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.