Umesh Kolhe Murder Case | अमरावतीतून आणखी दोघांची अटक; या प्रकरणातील आरोपींची संख्या नऊ

Umesh Kolhe Murder Case

Umesh Kolhe Murder Case | अमरावती : शहरातील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या खून प्रकरणातील आणखी दोन आरोपींना एनआयएच्या पथकाने बुधवारी (दि. 3) अटक केली. या दोघांमुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या नऊ झाली आहे.

दरम्यान, एनआयएच्या पथकाने अटक केलेल्या दोघांना आज स्थानिक न्यायालयात हजर केले आणि ट्रान्झिट रिमांडची मागणी केली. यावेळी ट्रान्झिट रिमांड मिळाला असून, दोघांना 7 ऑगस्टपूर्वी मुंबईच्या एनआयए कोर्टात हजर करायचे आहे.

उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर आरोपी मारेकऱ्यांना आश्रय दिल्याचा आरोप आहे. त्याचवेळी दुसरा आरोपी हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शेख इरफान याच्या जवळचा असून त्याच्या वाहनाचा चालक आहे.

तो अनेकवेळा इरफानसोबत राहत असल्याचे समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. एनआयएचे पथक मंगळवारी (दि. 2) शहरात दाखल झाले असून, यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत या दोघांचा सहभाग समोर आला आहे.

त्याआधारे एनआयएच्या पथकाने मंगळवारी दिवसभर दोघांचा शोध घेतला आणि मंगळवारी रात्री त्यांना ताब्यात घेतले. एनआयए अटक आरोपींच्या घरांची झडती घेऊन त्यांच्याविषयी इतर माहिती काढण्याचे काम करत आहे.

दरम्यान, अटकेनंतर 24 तासांच्या आत दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करणे आवश्यक आहे. त्यामुळेच एनआयएच्या पथकाने बुधवारी दुपारी दोघांनाही स्थानिक प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले आणि ट्रान्झिटमध्ये कोठडीत ठेवण्याची विनंती केली.

त्यावेळी स्थानिक न्यायालयाने ही विनंती मान्य करत 7 ऑगस्टपूर्वी मुंबईच्या एनआयए न्यायालयात हजर राहण्याची परवानगी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.