आजची कविता : सांजावलेल्या आठवणी

सांजावलेल्या आठवणी

******
एकेक करून उतरतात
मनाच्या कॅनव्हासवर…..

झुलवत राहतात स्मृतींना
अलवारपणे
मोरपिशी स्पर्श देऊन …..

हळूच गहिवर दाटून येतो
कंठाशी …
मोहळ उठतं
तुझ्या माझ्या
अस्तित्वहीन खुणांचं
ज्या कधीच पुसल्या गेल्यात
वाळूवरच्या नावासारख्या
हलक्याशा लाटेसरशी …..

मेंदूच्या कपारीतून
सांडत राहतात
खरखरीत काही तुकडे …
काही भुगा
परंतु …
भूतकाळात फारशी
न रमणारी मी
निघते पुढच्या प्रवासाला
पुन्हा सर्जनशील होण्यासाठी….
कारण …
उत्पत्ती, सृजन आणि विलय
हा निसर्गनियम मानते मी ….

****

धनश्री पाटील, नागपूर