Sanjay Raut : 1034 कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत प्रचंड अडचणीत !

Sanjay Raut

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन आणि धक्कादायक घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेचे एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे संयुक्त सरकार स्थापन झाले आहे.

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टोकाची टीका केल्याचे पाहायला मिळाले. या घडामोडींपैकी आज एक महत्त्वाची घटना घडली. आज सकाळी संजय राऊत यांच्या घरावर ईडीने छापा टाकला गेला.

संजय राऊत यांच्याशी संबंधित तीन ठिकाणी ईडीचे अधिकारी छापे टाकत आहेत. संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाची कसून चौकशी केली जात आहे.

राऊत यांना आज ईडी अटक करू शकते, या चर्चेला सध्या वेग आला आहे. खुद्द ईडीच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. त्याआधी राऊत यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात येणार आहे.

कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे राऊत यांना अटक होण्याची शक्यता आहे. ईडीच्या या कारवाईमुळे संजय राऊत चांगलेच अडचणीत आले आहेत.

राऊत इतके अडचणीत येण्यामागचे नेमके कारण काय, याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आले आहेत.

हा 1034 कोटींचा घोटाळा असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, जमिनीच्या व्यवहारासंदर्भात एका महिलेला बळजबरीने आणि शिवीगाळ केल्याच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

संबंधित ऑडिओ क्लिप संजय राऊत यांची असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. विशेष म्हणजे ईडीनेही या क्लिपची सुमोटो दखल घेतली आहे.

या व्हायरल क्लिपमध्ये जमिनीच्या व्यवहाराची काय चर्चा आहे? असा सवाल ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संजय राऊत यांच्या विरोधात ईडीच्या तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये 11 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये 1 महिला अधिकाऱ्याचा समावेश आहे.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना दोनदा ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राऊत दिल्लीत होते.

त्यामुळे पावसाळी अधिवेशनाचे कारण देत त्यांनी चौकशीला उपस्थित राहणे टाळले. दरम्यान, राऊत आज मुंबईत आहेत. याचाच फायदा घेत ईडीच्या अधिकाऱ्यांनी सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेत आज सकाळी साडेसातच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकला.

त्यांनी संजय राऊत यांच्या घराची झडती सुरू केली, तसेच राऊत कुटुंबाची चौकशी सुरू केली. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात राऊत आणि त्यांचे जवळचे मित्र अडचणीत आले आहेत.

ईडीकडून आज अतिशय वेगाने आणि निर्भयपणे कारवाई करण्यात येत आहे. संजय राऊत यांच्या भांडुप येथील घराची ईडी झडती घेत आहे. तसेच दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीच्या २५ व्या मजल्यावर संजय राऊत यांचे घर आहे.

राऊत तिथे राहत नाहीत. मात्र तिथे अनेक बैठका होतात. त्यामुळे ईडीचे अधिकारीही तेथे दाखल झाले आहेत. तिथून ईडीचे पथक अद्याप बाहेर आलेले नाही. दोन्ही घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे राऊत यांचे घर असलेल्या परिसरातच नव्हे तर बॅलार्ड पिअर भागातील ईडी कार्यालयाजवळही कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ईडी कार्यालयाजवळ राज्य राखीव पोलीस दल आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे काहीतरी मोठे घडेल, राऊत यांना ईडी कार्यालयात आणून अटक केली जाईल, अशा चर्चा रंगल्या आहेत.