मुंबई, दि. 14 : आज जेव्हा आपण आपल्या देशाच्या शेजाऱ्यांकडे बघतो त्यावेळी राजकीय स्थैर्य आणि लोकशाहीची किंमत लक्षात येते.
भारताचे राजकीय स्थैर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी काढले.
राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे आदी यावेळी उपस्थित होते.
खासदार शरद पवार म्हणाले, भारतासारख्या खंडप्राय देशात जिथे अनेक धर्म, जाती आणि विविधता आहे तिथे राजकीय स्थैर्य निर्माण करण्याचे श्रेय बाबासाहेबांना जाते.
भारतीय राज्यघटनेची निर्मिती हे महान कार्य तर बाबासाहेबांनी केलेच पण त्याशिवाय ते एक अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला जी दिशा दाखविली त्यातूनच स्वतंत्र भारताच्या प्रगतीला गती मिळाली.
आज जेव्हा आपण वीजटंचाईचा प्रश्न पाहतो त्यावेळी बाबासाहेबांनी स्वतंत्र भारतात वीजनिर्मितीला अधिक महत्त्व दिले पाहिजे यासाठी जी आग्रही भूमिका मांडली, तिचे महत्त्व अधिक समजून येते.
जलविद्युत निर्मिती आणि सेंट्रल पॉवर ग्रीड यासाठी त्यांनी केलेले कार्य निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. देशात उद्योग व्यवसाय वाढले पाहिजेत आणि त्यासोबतच कामगारांच्या हक्कांवर गदा येता कामा नये अशी भूमिका त्यांनी मांडली.
आज जेव्हा देशभर आपण फिरतो त्यावेळी बाबासाहेबांचे विचार किती खोलवर पोहोचले आहेत याची जाणीव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचारांनी समाजात समता, बंधुता आणि न्याय ही तत्वे रूजविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने गेल्या दोन वर्षात केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. विभागाला कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही याची काळजी घेतली आहे.
मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवर होत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक येत्या दोन वर्षात पूर्णत्वास जाईल, असा मला विश्वास वाटतो.
तसेच लंडन येथील बाबासाहेबांच्या घराचे संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी 15 कोटी रूपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे.
या विभागाचे मंत्री धनंजय मुडे यांनी विभागातर्फे विद्यार्थी, नवउद्योजक आणि तळागाळातील कष्टकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे.
आज बार्टीसारख्या संस्थांच्या पाठबळामुळे विद्यार्थी अखिल भारतीय नागरी सेवेत उत्तीर्ण होत आहेत तसेच विविध शिष्यवृत्यांच्या माध्यमातून मुलांना परदेशातील चांगल्या शिक्षण संस्थांतून उच्चशिक्षण मिळत आहे.
जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शिष्यवृत्तीमुळे राज्यातील वंचित आणि गरीब घटकांतील मुलांना परदेशातील उच्च शिक्षण घेणे शक्य होत आहे.
2003 मध्ये अर्थमंत्री असताना वंचित घटकांतील गुणवंत मुलांना परदेशी शिक्षण मिळावे यासाठी आम्ही पहिल्यांदा योजना आणली. आज त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे हे या घटकांतील विद्यार्थी आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे करत असलेले कार्य निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या प्रयत्नातूनच इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाची उंची शंभर फुटापर्यंत वाढविण्यात आली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले, सामाजिक न्याय विभागाला 12 हजार कोटींहून अधिक रूपयांच्या निधीची तरतूद केल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे विशेष आभार मानतो.
या विभागाला कोणतीही आर्थिक चणचण भासू नये यासाठी ते विशेषत्वाने प्रयत्न करत आहेत. इंदू मिल येथील जागतिक दर्जाचे होत असलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकाला निधीची कोणतीही कमतरता नाही.
तत्पूर्वी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत येणाऱ्या ‘बार्टी’मार्फत प्रशिक्षण घेतलेल्या आणि केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत यश मिळविलेल्या सचिन पवार, सौरभ व्हटकर, अर्चना वानखेडे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अर्चना वानखेडे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर मार्जिन योजनेचा लाभ घेलेल्या अश्विनी पार्सेकर, वैशाली खांडेकर, सुचिता गवळी, विद्या हांडोरे यांचा सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे परदेशी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांपैकी पवनकुमार सूर्यवंशी, अतुल कांबळे, सुमित कांबळे यांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला.
यावेळी सुमीत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर डिक्कीचे प्रतिनिधी संतोष कांबळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला.
नवउद्योजकांना राज्याचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कसा मदत करतो याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच राज्य शासन नवउद्योजकांच्या पाठिशी उभे राहत असल्याबद्दल आभार व्यक्त केले.
दरम्यान, समान संधी केंद्र (Equal Opportunity Center), बार्टीतर्फे करण्यात येणाऱ्या बेंचमार्क सर्वे आणि स्वयंसहाय्यता युवा गटाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
तसेच विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या विविध पुस्तिकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमापूर्वी आनंद शिंदे यांनी ‘स्वरांजली’ हा कार्यक्रम सादर केला. प्रास्ताविक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी केले.
समाज कल्याणचे पुणे विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये उपस्थित होते.