Dr.Babasaheb Ambedkar Jayanti | शोषित, वंचितांचे कैवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  Dr. Bharat Ratna, the champion of the exploited and deprived. Babasaheb Ambedkar

   Dr.Babasaheb Ambedkar Jayanti | डॉ.बाबासाहेबांनी तमाम वंचित आणि शोषितांसाठी कार्य केले. खास करुन शेतकरी, शेतमजूरआणि महिलांच्या समस्यांची विशेष चिकित्सा करुन त्यावर उपाय सुचवले. शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण करणारी खोती पद्धत कोकणात अस्तित्वात होती. खोती पद्धतीचे प्राबल्य नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी लढा दिला.

  ठराविक कालावधीच्या अंतराने येणारा दुष्काळ हे शेतकऱ्याचे मोठे दु:ख आहे. अशा प्रसंगी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी त्यांनी विविध योजना सुचवल्या. त्यापैकीच एक म्हणजे ‘पीक विमा योजना’.

  शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करावी याकरिता नद्या जोड प्रकल्प, सिंचनाचे प्रकल्प आदी महत्त्वाच्या योजना होत्या. शेतीसाठी मुबलक व स्वस्त दरात वीज उपलब्ध करुन देण्याबाबतही डॉ.बाबासाहेब आग्रही होते. त्यांनी राज्यघटनेच्या कलमानुसार शेतकऱ्यांसाठी खास लवाद निर्माण करण्याची तरतूद निर्माण केली.

  डॉ.बाबासाहेबांच्या लेखनातील ताकद

  डॉ.बाबासाहेबांच्या लेखनात, वाचनात व चिंतनात प्रचंड ताकद, शक्ती होती. ज्ञानसंपादनाच्या शक्तीमुळेच व्यक्ती, समाज, राज्य आणि राष्ट्र महान बनते याची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. त्यांनी आपल्या लिखाणातून व कार्यातून तळागाळातील माणूस जागा केला.

  त्यांना आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता याची जाणीव करुन दिली. मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा मांडण्यासाठी डॉ.आंबेडकरांनी  १९२० साली पहिले मराठी पाक्षिक ‘मूकनायक’ सुरु केले.

  शैक्षणिक विचार

  शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपल्या कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. तत्कालीन समाजातील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या घटकाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी डॉ.आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात सांगितले.

  शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो पिईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असेही ते म्हणत. समाजाच्या सर्व स्तरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षणाने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो.

  प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी सांगितली. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय व्हावीत. मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे असे ते नेहमी म्हणत.

  (संदर्भ : लोकराज्य, इंटरनेट व विविध लेख)