मुंबई : गांधीवादाने या देशाचा आणि महाराष्ट्राचा नेहमीच विश्वासघात केला आहे, असे वादग्रस्त विधान अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांनी केले आहे. गांधीवादी राजकारणी देशात मोठे षडयंत्र रचत असल्याचा आरोपही सदावर्ते यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी नथुराम गोडसे यांचा उल्लेख सदावर्ते नथुरामजी गोडसे असा केला. शेवटचा श्वास घेताना महात्मा गांधींनी ‘हे राम’ म्हटले होते, असे म्हटले जाते.
मात्र नथुरामजी गोडसे यांच्यावर न्यायालयात खटला चालला तेव्हा नथुरामजी गोडसे म्हणाले की, गांधीजींनी ‘हे राम’ म्हटले नाही, ही वस्तुस्थिती लपवून ठेवण्यात आली, असे सदावर्ते म्हणाले.
एसटी कामगार संघटनेची स्थापना
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज एसटी कष्टकरी जनसंघाची स्थापना केली. यावेळी सदावर्ते यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. आज आम्ही आमच्या नवीन संघटनेची घोषणा करत आहोत, ते कार्यकर्ते नसून प्रचारक असतील.
ते राज्यांमध्ये जाऊन प्रचार करण्याचा प्रयत्न करतील. एसटी कष्टकरी जनसंघाचे प्रचारक प्रत्येक प्रभागात जाऊन आगामी निवडणुकीत प्रचार करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
सदावर्ते यांना तुरुंगात जावे लागले
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक येथील निवासस्थानात घुसून एसटी कामगारांनी आंदोलन सुरू केले होते.
सदावर्ते यांच्यावर आंदोलकांना चिथावणी दिल्याचा आरोप होता. याप्रकरणी सदावर्ते यांना तुरुंगात जावे लागले होते. 26 एप्रिल रोजी सदावर्ते यांना जामीन मंजूर करण्यात आला.
सक्रिय राजकारणात प्रवेश?
बाहेर आल्यानंतर सदावर्ते यांनी पुन्हा सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. सदावर्ते यांनी नेहमीच शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
शरद पवार यांनी एसटी कामगारांचे नुकसान केल्याचा गंभीर आरोपही सदावर्ते यांनी केला होता. सदावर्ते यांचाही लवकरच सक्रिय राजकारणात प्रवेश होण्याची शक्यता आहे.