जिल्ह्यातील तृतीयपंथी यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना

Latur News

लातूर : जिल्ह्यातील तृतीयपंथी यांच्या समस्या तसेच तक्रारी संदर्भात तक्रार निवारण समितीची स्थापना दिनांक 7 ऑक्टोबर 2020 च्या शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे.

त्यानुसार लातूर जिल्ह्यामध्ये तृतीयपंथी यांचे तक्रार निवारण व त्यांचे हक्कांचे सरंक्षण करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

दि.31 मार्च 2022 हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्तांने दि. 27 मार्च ते एप्रिल 2022 हा तृतीयपंथीय मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्या अनुषंगाने उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे पत्रान्वये या सप्ताहामध्ये एक दिवशी तृतीयपंथी मतदार नाव नोंदणीसाठी विशेष शिबीर आयोजन करण्याबाबतचे निर्देश होते.

त्यानुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी उपविभागीय अधिकारी सर्व व तहसिलदार सर्व जि. लातूर यांना शिबीराचे आयोजन करणे बाबत कळविले होते.

त्यानुसार तहसिलदार, तहसिल कार्यालय लातूर व सहाय्यक अयुक्त समाज कल्याण कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 मार्च 2022 ते 2 एप्रिल 2022 तृतीयपंथीय सप्ताह आयोजीत केला होता.

त्या निमित्ताने दिनांक 1 एप्रिल 2022 रोजी विशेष मतदान नोंदणी शिबीराचे आयोजन तहसिल कार्यालय लातूर येथे करण्यात आले होते.

लातूर जिल्ह्यातील ज्या तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींकडे मतदान ओळखपत्र नाहीत अशा तृतीयपंथीय व्यक्तींना सर्व कागदपत्रासह तहसिल कार्यालय लातूर येथे उपस्थित राहणे बाबत कळविण्यात आले होते.

त्यानुसार लातूर शहरातील 15 तृतीयपंथी मतदान नोंदणी शिबीरास हजर होते. ज्या तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत समाविष्ट नाही अशा मतदारांची नोंदणी ऑनलाईनव्दारे करुन घेण्यात येणार आहे.

सोबतच ज्या तृतीयपंथी मतदाराचे नांव मतदार यादीमध्ये समाविष्ट आहे मात्र त्यांचे नावासमोर स्त्री अथवा पुरुष अशीही नोंद झालेली आहे त्याकरिता त्यांचेकडून फॉर्म नंबर 8 नुसार ऑनलाईन प्रणालीत दुरुस्ती करुन घेण्यात येणार आहे.

तसेच ज्या तृतीयपंथीयांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे अशांना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच ज्या तृतीयपंथीयांचेी ऑनलाईन नोंदणी झालेली नाही अशांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी कागदपत्र प्राप्त करुन घेण्यात आले.

तृतीयपंथी मतदार नोंदणी शिबीरास अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे, उपविभागीय अधिकारी सुनिल यादव,समाज कल्याण निरीक्षक संदेश घुगे, श्रीमती प्रिती माऊली लातूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी तृतीयपंथीयांविषयी मनोगत व्यक्त केले.तसेच श्रीमती प्रिती माऊली लातूरकर यांनी तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींच्या समस्याबाबत मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तहसिलदार स्वप्नील पवार यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसिलदार निवडणूक कुलदीप देशमुख यांनी केले.तालुका समन्वयक शिंदे एस.टी. यांनी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे व सर्व निमंत्रीतांचे आभार व्यक्त केले.