लातूर : अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहे.
या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत, या करीता राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम दि. 6 एप्रिल 2022 ते 16 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये साजरा करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
दि. 6 एप्रिल 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशेटवार समाज कल्याण विभाग, लातूर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करुन सदर सामाजिक समता कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तद्नंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबाबत मान्यवरांनी आपले विचार मांडले तसेच या अविनाश देवशेटवार यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमा निमित्त दि. 6 एप्रिल 2022 ते 16 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणा-या विविध कार्यक्रमाबाबतची माहिती दिली.
तसेच या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेची माहिती पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर, महात्मा बसवेश्वर समाजकार्य महाविदयालयाचे विभाग प्रमुख, डॉ. दिनेश मौने, प्राध्यापक डॉ. संजय गवई, प्राध्यापक काशिनाथ पवार, प्राचार्य निलेश राजेमाने व महात्मा बसवेश्वर समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी/विद्यार्थ्यीनी उपस्थित होते. तसेच प्रादेशिक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, लातूर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, लातूर संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ,लातूर, वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ, लातूर इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, लातूर येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन गोडबोले अशोक यांनी केले तर आभार प्रदर्शन बापू चव्हाण यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.