Latur Agri News : ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मिळणार कृषी सेवा केंद्राचा परवाना

Agri News, लातूर कृषी

लातूर : कृषी विभागाने आधुनिकतेची कास धरत डिजिटल व्यवस्था सुरु केली आहे. कृषी सेवा केंद्र सुरु करण्यास इच्छुकांना ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अगदी कमी वेळात परवाना प्राप्त होणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

परवाना नूतनीकरणासाठीही ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे. मागील दोन महिन्यांत जिल्ह्यात या माध्यमातून 94 जणांना डिजिटल परवाना वितरीत करण्यात आला आहे. खते, बियाणे परवाना यासाठी आपले सरकार पोर्टलवर यावर्षीपासून सुविधा कृषी विभागाच्या वतीने सुरु करण्यात आली आहे.

त्याअंतर्गत घरबसल्या कृषी सेवा केंद्रधारक किवा नवीन इच्छुक पात्र लाभार्थी यांना आता घरूनच आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून परवाना सेवा घेता येणार आहेत.

जिल्हास्तरावर कृषी अधिकारी, कृषी उपसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून ऑनलाईन पोर्टलवर स्क्रूटीनी करून अल्पवेळेत परवाना देणार आहेत.

तालुका कृषी अधिकारी स्तरावरून फिजिकल प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता नाही. तसेच कीटकनाशके नवीन व नुतनीकरण असे दोन्ही विक्री परवाने मागील दोन दिवसापासून आपले सरकार सेवा पोर्टलवर ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे.

या पूर्वी बियाणे, खते व कीटकनाशके विक्री परवाना घेतलेल्या सर्व कृषी सेवा केंद्रधारकांना तसेच नवीन इच्छुक लाभार्थ्यांना आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज दिनांक 30 एप्रिल 2022 पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, डी.एस. गावसाने यांनी केले आहे.