Pune MNS News Update : पुण्यातील मनसेतील नाराजी नाट्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील प्रमुख नेत्यांना मुंबईत बोलावले होते. पुणे मनसे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांना मात्र मुंबईत बोलावण्यात आले नाही.
अखेर वसंत मोरे यांची पुणे मनसे शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आज पुणे शहराध्यक्षपदी नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
साईनाथ बाबर यांचे नवीन जबाबदारीसाठी अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा’ असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
काय म्हणाले वसंत मोरे?
आपल्या प्रभागात शांतता हवी असल्याने हनुमान चालीसा करणार नाही, असे राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर वसंत मोरे म्हणाले होते. राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचेही ते म्हणाले.
आमच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा केली. पण आता रमजान सुरू असल्याने मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे.
त्यामुळे मी हनुमान चालीसा वगैरे लावणार नाही याचा अर्थ मी राज ठाकरे किंवा पक्षावर अजिबात नाराज आहे असे नाही, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले होते.
वसंत मोरे यांच्या भूमिकेनंतर मनसेच्या गोटात वादळ निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी गुरुवारी शिवतीर्थवर पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
या बैठकीला बाबू वागस्कर, अनिल शिदोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांना बोलावण्यात आले होते. तर वसंत मोरे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. तेव्हाच वसंत मोरे यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार, याची कुणकुण लागली होती.
काय म्हणाले राज ठाकरे?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर आयोजित सभेला संबोधित करताना वक्तव्य केले होते.
त्यानंतर मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. मशिदीवरील भोंगे न काढल्यास मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसाचा पाठ करावा, असे राज ठाकरे म्हणाले होते.
त्यानंतर मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते नाराज झाल्याचे दिसून आले. काही कार्यकर्त्यांनी राजीनामेही दिले होते.
मुस्लिम पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर केलेल्या भाषणात मशिदीवरच्या भोंग्याविरोधात एल्गार केला होता. मात्र त्याच एल्गाराचे साईड इफेक्ट पक्षात दिसू लागले आहेत.
पुण्यातल्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. विकासाच्या ब्लू प्रिंटवरुन थेट भोंगे हटवण्यापर्यंत भूमिका का बदलली, असा प्रश्न मनसेचे काही पदाधिकारी विचारत आहेत.
वसंत मोरेंनी तर थेट त्यांच्या प्रभागात हनुमान चालिसा लाऊड स्पीकरवर लावणार नसल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे पक्षादेश झुगारुन लावला आहे.
वसंत मोरे यांची गोची
कात्रज येथील वसंत मोरे हे गेली 10 वर्षे नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. वसंत मोरे हे जातीने मराठा आहेत. मात्र, मनसेऐवजी वसंत मोरे यांच्या कामामुळे त्यांच्या मतदारसंघातील मुस्लिम मतदार त्यांच्या मागे राहिला आहे.
कात्रज मतदारसंघात मुस्लिमांची ३,८०० मते आहेत आणि ही मते गेम चेंजर आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांची गोची झाल्याचे बोलले जात आहे.