राज्य महिला आयोग आक्रमक, अब्दुल सत्तार यांच्याविरोधात पोलीस महासंचालकांना कारवाई करण्याची सूचना

मुंबई : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवीगाळ केली. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील बंगल्याच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या घरावर दगडफेक केली.

या प्रकरणी राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणाची दखल घ्यावी लागली.

त्यांनी सत्तार यांना बोलावून समजावून सांगितले. तसेच माफी मागण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्य महिला आयोगालाही या प्रकरणाची दखल घ्यावी लागली.

अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने कारवाईची मागणी केली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी. या प्रकरणाचा अहवाल तातडीने सादर करावा, अशा सूचना महिला आयोगाने दिल्या आहेत.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माध्यमांना मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आपली भूमिका मांडली.

राज्य महिला आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून याप्रकरणी तातडीने कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल महिला आयोगाला तातडीने सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.

हा सत्तेची मजा आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अशी विधाने करणे चुकीचे आहे. अशी विधाने करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना राज्य महिला आयोग जारी करेल, असेही त्या म्हणाल्या.

अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा जाहीर निषेध करते. या विधानानंतर महिला आयोगाकडे राज्यभरातून अनेक तक्रारी आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

महिलांना कमी लेखणे, त्यांना अपमानास्पद वागणूक देणे, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणे, त्यांच्या कर्तृत्वाची बदनामी करणे याची महिला आयोगाने दखल घेतली आहे.

या संदर्भात अब्दुल सत्तार यांनी केलेले विधान अत्यंत निंदनीय आहे, अशी तीव्र नापसंती चाकणकर यांनी व्यक्त केली. खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल त्यांचे असे विचार असतील, तर राज्यातील सर्वसामान्य महिलांबद्दल त्यांना काय वाटत असेल, याबद्दल विचार न केलेलाच बरा; असं देखील रुपाली चाकणकर यांनी यावेळी म्हटले.