Crime News : अवघ्या पाच दिवसांपूर्वी ती तिच्या प्रियकरासोबत राहायला गेली आणि जीव गमावला, हत्येचे कारण अज्ञात

0
31
Just five days ago, she moved in with her boyfriend and lost her life motive murder unknown

अंबरनाथ : अज्ञात कारणावरून प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील नेवली गावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हिललाइन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

लक्ष्मी तायडे असे मृत महिलेचे नाव असून, विकी देवकाते असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

पाच दिवसांपूर्वी अकोल्याहून अंबरनाथला आले 

विकी देवकाते आणि लक्ष्मी तायडे हे दोघेही मूळचे अकोला जिल्ह्यातील आहेत. पाच दिवसांपूर्वीच हे दोघे अकोल्याहून अंबरनाथच्या नेवली भागात राहण्यासाठी आले होते.

लक्ष्मीचे आधीच लग्न झालेले 

लक्ष्मीचे आधीच लग्न झाले होते. मात्र पतीसोबत झालेल्या वादामुळे ती त्याच्यापासून वेगळी राहत होती. त्यानंतर तिचे विकी देवकातेसोबत प्रेमसंबंध जुळले आणि ती विकीसोबत अकोल्याहून अंबरनाथला राहायला गेली.

लक्ष्मीची हत्या करून आरोपी फरार

हे दाम्पत्य अंबरनाथला येऊन अवघे पाच दिवस झाले होते. पाच दिवसांतच विकीने लक्ष्मीची गळा आवळून हत्या केली आणि तेथून फरार झाला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर हिललाइन पोलिसांना या खुनाची माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच हिललाइन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून लक्ष्मीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

खुनाचा गुन्हा दाखल

हिललाइन पोलिसांनी विकी देवकाते याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस फरार विक्कीचा शोध घेत आहेत. लक्ष्मीच्या हत्येमागील नेमके कारण काय, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

उल्हासनगर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी सांगितले की, विकीला अटक केल्यानंतरच खुनाचा उलगडा होईल.