मतं मागायची असतील तर तुमच्या बापाच्या नावाने मागा : उद्धव ठाकरे संतापले

उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यावर संतापले

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटाने आपल्या गटाचे नाव बाळासाहेब ठाकरे गट ठेवण्याची तयारी चालवली आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे नाव घेणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. हिंमत असेल तर तुमच्या बापाच्या नावाने मते मागा, असे उद्धव ठाकरे खडे बोल सुनावले आहेत.

आज शिवसेना भवनात झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांनाच असतील, हे आता स्पष्ट झाले आहे.

यावेळी त्यांनी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी गद्दारी केलेली नाही. इथून पुढे करणार नाही. हिम्मत असेल तर तुमच्या बापाच्या नावाने मते मागा. आधी नाथ होते, आता गुलाम झालेत’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी 40 हून अधिक आमदारांसह बंड केल्याने शिवसेना अडचणीत आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनानंतर शिंदे यांनी आपला बंड सुरूच ठेवला आहे.

तसेच शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने तातडीने राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज दुपारी शिवसेना भवनात बोलावली होती.

या बैठकीत एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांची राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाचे नाव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठेवल्याने महाराष्ट्रातील शिवसैनिक आणखीनच आक्रमक झाले आहेत.

जाणीवपूर्वक आपल्या गटाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील जनतेला भावूक करत आहेत, असे शिवसैनिकांनी म्हटले आहे. कुणी शिवसेनेतून बंड करून शिवसैनिक होतो का? असा प्रश्नही शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.