औरंगाबाद : महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून दररोज सरासरी 10 ते 12 हजार वाहने ये-जा करतात. येत्या काळात ही संख्या वाढणार असून महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी 21 ठिकाणी क्विक रिस्पॉन्स वाहने सज्ज असल्याची माहिती मुख्य अभियंता बी. जी.साळुंके यांनी दिली आहे.
समृद्धी महामार्गाने राज्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या वर्दळीच्या महामार्गावर काही वाहनचालक वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या सात दिवसांत जवळपास 30 वाहनांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने साशंक आहेत. या पार्श्वभूमीवर रस्ते विकास महामंडळामार्फत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे.
अपघातग्रस्तांसाठी 15 रुग्णवाहिका
महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्त वाहन बाजूला घेण्यासाठी 13 ठिकाणी क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी एकूण 15 रुग्णवाहिका सज्ज आहेत.
तसेच, स्थानिक रुग्णालयांना रुग्णवाहिका जोडण्यात आल्या आहेत. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी 108 वर संपर्क साधा.
महामार्गावर 24 तास सुरक्षा रक्षक
कंट्रोल रूममधून सर्व सुविधा यंत्रणांचे 24 तास बारकाईने निरीक्षण केले जाते. महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मदतीसाठी राज्य सुरक्षा महामंडळाचे एकूण 121 सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत.
1800 233 2 233 आणि 81 81 81 81 55 हे 24 तास हेल्पलाइन क्रमांक वाहनांचे बिघाड, अपघात झाल्यास कार्यरत असून हे क्रमांक महामार्गावर विविध ठिकाणी प्रदर्शित केले जातात.
प्रत्येक इंटरचेंजवर असलेली स्वतंत्र नियंत्रण यंत्रणा औरंगाबादजवळील सावगी इंटरचेंज येथील मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडलेली आहे.
13 पेट्रोल पंप, प्रसाधनगृहे
नागपूर ते शिर्डीकडे 7 ठिकाणी आणि शिर्डी ते नागपूरच्या दिशेने 6 ठिकाणी एकूण 13 ठिकाणी पेट्रोल-डिझेल पंप देण्यात आले आहेत.
या ठिकाणी स्वच्छतागृहे, खानपान सेवा, वाहनांची किरकोळ दुरुस्ती आणि टायर पंक्चर काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
टॉयलेटची सुविधाही टोल स्टेशनवर उपलब्ध आहे. याशिवाय समृद्धी महामार्गावर 16 ठिकाणी महामार्ग सुविधा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे.