मुंबई : भाजपने राज्यसभा आणि विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली होती.
मात्र, भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पत्ता कापल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याच पार्श्वभूमीवर एका कार्यकर्त्यानेही कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आता शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेतील संधी गमावल्यानंतर बीडमधील त्यांच्या समर्थकांसह भाजप पदाधिकाऱ्यांची अस्वस्थता चव्हाट्यावर आली.
आधी प्रीतम मुंडे (Preetam Munde) यांचे मंत्रिपदाच्या यादीतून वगळण्यात आले. आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेच्या यादीतून नाव वगळण्यात आले, त्यामुळे बीडमधील भाजप नेते आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
“आम्हाला पंकजा मुंडे यांची काळजी आहे. कारण त्या गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आहेत. गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे चांगले संबंध अतिशय कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे होते.
त्यामुळे त्यांच्या कुटुंबात काही वेगळे घडत असेल, तर नक्कीच आम्ही कुटुंब म्हणून काळजी करीत आहोत, तुम्ही राजकारणाच्या दृष्टीकोनातून बघा,” असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांच्या राजकीय भूमिकेवर चिंता व्यक्त केली.
पंकजा मुंडे असोत, प्रीतम असोत, किंवा अन्य कोणीही असो, त्यांचे आणि ठाकरे कुटुंबाचे शिवसेनेशी अतूट नाते आहे. म्हणूनच काळजी करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे.
महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती टिकवण्यात आणि वाढवण्यात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा असल्याचंही राऊत यांनी सांगितलं.
आम्हाला 2 दिवस ईडी द्या
आम्हाला 2 दिवस ईडी दिल्यास देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील. महाराष्ट्रातही निवडणूक आयोगाला हाताशी धरून रात्रीच्या अंधारात नेते काय करत होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे, असे म्हणत राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.