Vinayak Mete Death | विनायक मेटे यांचे अपघाती निधन

मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या गाडीला आज पहाटे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर त्यांना एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आज पहाटे विनायक मेटे आणि त्यांचे सहकारी बीडहून मुंबईकडे जात होते. यावेळी पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला अपघात झाला होता.

अपघातानंतर तब्बल एक तास त्यांना मदत मिळाली नसल्याचं त्यांच्या गाडीच्या चालकाने सांगितलं आहे. अखेर त्यांनी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.

दरम्यान, पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला एका मोठ्या गाडीने डाव्या बाजून धडक दिली. ट्रकच्या बंपरमध्ये आमची गाडी अडकली आणि आम्हाला फरपटत नेलं असं त्यांच्या गाडीचे चालक एकनाथ कदम यांनी सांगितलं आहे.

त्यानंतर मी पोलिसांना १०० नंबरवर कॉल केला पण त्यांची मदत लवकर मिळाली नाही. तब्बल एका तासानंतर आम्हाला मदत मिळाली असा आरोप त्यांच्या चालकाने केला आहे.

मराठा आरक्षणासाठी त्यांचे मोठे योगदान होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आणि समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने गेली अनेक वर्षे त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून योगदान दिले होते. त्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली असून, “मराठा आरक्षणासाठी नेटाने झगडणारा नेता अचानक गेला” अशा शब्दांत भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

त्याचबरोबर मराठा समाजासाठी झगडणारा नेता गेला पण आता त्यांच्या मागे मराठा समाजाला न्याय मिळायला पाहिजे अशा शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.