ST Employees Protest : एसटी कामगारांच्या आंदोलनामागील सूत्रधार शोधू, दोषींवर कारवाई करू : गृहमंत्री

ST Employees Protest: Find the mastermind behind the ST workers' agitation, take action against the culprits: Home Minister

मुंबई, 8 एप्रिल : राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना हाय कोर्टाने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. उच्च न्यायालयाने काल (7 एप्रिल) पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले.

मात्र, आज दुपारच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर अचानक मोठ्या संख्येने एसटी कामगार जमा झाले.

आंदोलकांनी शरद पवारांच्या घरावर दगड आणि चप्पलांचा एकच मारा केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. या आंदोलनानंतर आता राज्याचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

आजची अचानक घडलेली आणि दुर्दैवी घटना आहे, असे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. देशातील व राज्यातील ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला होणे ही चिंतेची बाब आहे.

यासोबतच गुप्तचर यंत्रणेचे इनपुट कसे चुकले याची माहिती घेतली जाईल. याबाबत पोलीस आयुक्त व सह पोलीस आयुक्तांना कळविण्यात आले आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

गृहमंत्री पुढे म्हणाले की, न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत कामावर रुजू होणे अपेक्षित होते.

मात्र आज एस टी कामगारांनी आज अचानक हल्ला चढवला. मला वाटते, हे एक सुनियोजित षड्यंत्र आहे. यामागे काही अज्ञात शक्ती असल्याशिवाय हे घडणार नाही.

एसटी कर्मचाऱ्यांना माझे एवढेच आवाहन आहे की, त्यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार कामावर रुजू व्हावे. आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही, असे आश्वासन सरकारने त्यांना दिले आहे.

काही अडचणी असतील तर संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

खरंच आंदोलक होते का?

काही राजकीय शक्ती एसटी कामगारांमध्ये हिंसाचार घडवून आणण्याचे काम करत आहेत. महिलांना पुढे करून पोलिसांना कारवाई करण्यापासून रोखले. खरंच आंदोलक होते का? याची चौकशी केली जाईल, असेही गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

नेते शरद पवार यांच्या भेटीला 

या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री आदित्य ठाकरे आणि इतर मंत्री शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

हे अत्यंत निंदनीय कृत्य : जयंत पाटील

जयंत पाटील म्हणाले की, आज शरद पवार यांच्या घरावर काही हल्लेखोरांनी दगडफेक केली. काल न्यायालयाच्या निर्णयानंतर काही लोक नाराज झाले असताना आज त्याच गटातील लोकांनी पवारांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक करण्याचे कारण काय?

महाराष्ट्रात आजपर्यंत कोणत्याही परिस्थितीत एखाद्या नेत्याच्या घरावर हल्ला करण्याच्या प्रकार घडलेला नाही. महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय पवार यांच्या घरावर दगडफेक करणे अत्यंत निंदनीय असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. पोलिस दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करून दोषींना अटक करतील.

RECENT POSTS