मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. या सरकारला वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे जनक शरद पवार आता पुढे आले आहेत.
एकनाथ शिंदे आणि सोबतच्या आमदारांना आधी महाराष्ट्रात येऊ द्या, असंतोष निर्माण करून आमदारांना वळवता येईल का, ते तपासा आणि तोपर्यंत तांत्रिक मुद्द्यांवर गुंतागुंत वाढवा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांशी संवाद सुरू असतानाही काही आमदार आज सकाळी गुवाहाटीत दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीवर आले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
शिवसेना आमदारांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराने पुढे येऊन मला सांगावे, मी आता राजीनामा द्यायला तयार आहे.
केवळ मुख्यमंत्रिपदच नाही तर मी शिवसेना पक्षप्रमुख पदाचाही राजीनामा देण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले.