मुंबई : बहुप्रतिक्षित राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराची वेळ अखेर आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. 12 किंवा 13 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
याबाबत विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारावरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
सरकार स्थापन होऊन चार महिने झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार का झाला नाही? असा सवाल करत विरोधकांनी उपस्थित करून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वेगवेगळे दावे केले.
काही नेत्यांनी तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळून मध्यावधी निवडणुकांचे भाकीत केले आहे. या सर्व दाव्या-प्रतिदाव्यांनंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारात एकूण 23 मंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण 23 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप आणि शिंदे गटामध्ये 50-50 टक्के असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
आमदार संजय कुटे, नितेश राणे आणि रवी राणा यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे, तर शिंदे गटातून बच्चू कडू, संजय शिरसाठ, भरत गोगावले यांना संधी मिळू शकते. शिंदे गटाचे हे तिन्ही नेते मंत्रिपदासाठी आग्रही आहेत.
शिंदे गटातील काही आमदार मंत्रीपदावर नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर शिंदे गटाचे सर्व आमदार गुवाहाटीला गेले होते.
हे सर्व आमदार कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटी येथे गेल्याचे सांगण्यात आले. तसेच या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शिंदे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा होती. अखेर ती चर्चा खरी ठरणार आहे. दुसरीकडे, विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचीही चर्चा होती.