आरोपींसोबत मटण पार्टी, आता पश्चातापाची वेळ; ‘त्या’ पोलिसांचे निलंबन

Mutton party with the accused, now is the time for repentance; Suspension of 'those' policemen

भंडारा : अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपींसोबत मटण पार्टी झोडणे पोलिसांना भोवले आहे. भंडाऱ्यात उपविभागीय अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी आरोपींसोबत मटण पार्टी केली होती. या पार्टीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

याबाबतचं वृत्त माध्यमांनी प्रसारित केले होते. सोशल मीडियावर देखील बरीच चर्चा होती. भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी या वृत्ताची दखल घेतली.

मटण पार्टी झोडणाऱ्या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. दिलीप धावडे, खुशाल कोचे, राजेंद्र लांबट अशी निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?

मंगळवारी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास भंडारा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना वाळू माफियांनी मारहाण केली होती. यावेळी त्यांच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या होत्या. २० ते २५ वाळू माफियांनी हा हल्ला केला होता.

याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी पवनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रारही दिली होती. त्यांच्या तक्रारीनंतर आरोपींच्या शोधासाठी काही पोलीस रवानाही झाले होते.

मात्र आरोपींना पकडून आणण्यापेक्षा पोलिसांनी त्याच्यासोबत एका हॉटेलमध्ये मटण पार्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

व्हिडिओत नेमकं काय होतं?

आरोपींसोबत केलेल्या मटण पार्टीत दिलीप ढवळे नामक पोलीस कर्मचाऱ्यांचे संभाषण सुरू होते. हा तर किरकोळ विषय आहे, तुमसर पोलीस स्टेशनला असताना अनेक आरोपींची नावे स्वत: उडवली आहेत, असं धक्कादायक वक्तव्य पवनी पोलीस स्टेनमध्ये कार्यरत असलेल्या दिलीप ढवळे नामक पोलीस कर्मचाऱ्याने केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत स्पष्ट दिसत होते. या व्हिडिओमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली होती.

शिवसेना आमदारांनी केली होती कारवाईची मागणी

भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी हा व्हिडिओ प्रसारमाध्यमांना दाखवत पोलीस आणि वाळू माफिया यांचे संबध किती सुमधुर आहेत.

अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना पवनी पोलीस कसे पकडतील, असा प्रश्न उपस्थित केला होता. इतकेच नाही तर त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली होती.

दरम्यान, भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी या प्रकरणाची दखल घेत तीनही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

तसेच तीनही पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून उपअधिक्षकांच्या परवानगी शिवाय त्यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

पोलिसांना प्रदान करण्यात आलेल्या गैरवापर करून पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.