मुंबई : मुंबईतील 1140 पैकी 135 मशिदींवर आज (दि.४) पहाटे पाचची अजाण झाली. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मनसे नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर कारवाई का? असा सवाल करत जोपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरविले जात नाही, तोपर्यंत मनसेचे आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आज सकाळपासून महाराष्ट्रातील मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांचे फोन येऊ लागले आहेत. मनसैनिकांना नोटिसा बजावल्या जात आहेत.
मात्र आमच्यावर कारवाई का केली जात आहे. मुंबईतील 1140 मशिदींपैकी 135 मशिदींमध्ये आज सकाळी अजान देण्यात आली. त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवालही त्यांनी केला.
आज 90% ठिकाणी सकाळची अजाण झाली नाही. मुंबईतील 1005 मशिदींमध्ये भोंगे वाजवले गेले नाहीत. त्या मशिदींच्या मौलवींचेही त्यांनी आभार मानले.
भोंग्याचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे
जोपर्यंत महाराष्ट्रातील मशिदींवर अनधिकृत भोंगे वाजणे बंद होत नाही तोपर्यंत मनसेचे हनुमान चालीसा आंदोलन सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला. भोंगा हा सामाजिक प्रश्न आहे, धार्मिक नाही.
मशिदींना वर्षभर परवानगी कशी मिळते, त्याचवेळी आमच्या सणांना 10 दिवसांची परवानगी मिळते. हा भेदभाव का?असेही त्यांनी विचारले.
अनधिकृत मशिदींवर भोंगे वाजवण्यास परवानगी मिळाल्यास आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवून दाखवू. या प्रश्नाला ‘कोणी धार्मिक रंग दिल्यास त्याच भाषेत उत्तर देऊ’ असा इशारा त्यांनी दिला.