MLC Elections | हा आहे विधानपरिषद निवडणुकीचा नंबर गेम, भाजप पुन्हा चमत्कार करणार का?

MLC Election

मुंबई, 19 जून : उद्या (दि.20 जून) होणाऱ्या विधान परिषद (MLC) निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकाही चुरशीच्या होत आहेत.

मुख्य म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेचे मतदान होणार नाही. विधान परिषदेसाठी गुप्त मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे.

त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीसोबतच विरोधी पक्ष भाजपनेही आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवले आहे. कारण भाजपला (BJP) देखील महाविकास आघाडीच्या पक्षांप्रमाणेच मतदार फुटण्याचा धोका आहे.

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अपक्ष आमदार फुटले आणि त्याचा मोठा फायदा भाजपच्या उमेदवारांना झाला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांसमोर आता मुख्य आव्हान आहे ते हा धोका टाळण्याचे.

महाविकास आघाडीतील पक्षीय ताकद पाहिल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून निवडून येण्याइतपत संख्याबळ आहे. काँग्रेसचा उमेदवार सहज निवडून येईल.

मात्र, दुसरा उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. त्यासाठी त्यांना पहिल्या पसंतीची 10 मते हवी आहेत. ही अतिरिक्त मते काँग्रेसला देण्यासाठी शिवसेनेकडे आवश्यक असलेली मते आहेत.

शिवसेनेकडे लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांची 10 अतिरिक्त मते आहेत. शिवसेनेच्या अतिरिक्त मतांवर काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराचा विजय अवलंबून आहे.

यासाठी महाविकास आघाडी एकत्रित मतांचे समीकरण योग्य पद्धतीने कसे बसवते याकडे सर्वांचे लक्ष असेल. तर दुसरीकडे भाजपचे 4 उमेदवार सहज निवडून येण्याइतपत संख्याबळ भाजपकडे आहे.

मात्र, पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला मोठे राजकीय कौशल्य वापरावे लागणार आहे. भाजपकडे लहान पक्ष आणि अपक्षांची 8 अतिरिक्त मते आहेत.

राज्यसभा निवडणुकीत भाजपला 9 आमदारांची मते मिळवण्यात यश आले होते. विधान परिषदेतही भाजपला ही मते मिळाली तर त्यांना एकूण 123 मते मिळत आहेत.

त्यामुळे भाजपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी 7 मतांची कमतरता आहे. त्यासाठी भाजपला महाविकास आघाडीची आणखी 7 मते मिळवावी लागणार आहेत. तरच भाजपच्या पाचही उमेदवारांच्या निवडणुकीसाठी 130 मतांचा जादुई आकडा गाठता येईल.

विधान परीषद निवडणुकीचे उमेदवार

भाजप

१. प्रविण दरेकर

२. श्रीकांत भारतीय

३. राम शिंदे

४. उमा खापरे

५. प्रसाद लाड

भाजपचे आमदार 106 + लहान पक्ष आणि अपक्ष आमदार 8 + राज्यसभा निवडणुकीत फोडलेले आमदार 9 = 123 (पाचवा उमेदवार जिंकण्यासाठी आणखी 7 मतांची गरज आहे.)

शिवसेना

१. सचिन अहिर

२. आमशा पाडवी

शिवसेना आमदार 55 + लहान पक्ष आणि अपक्ष आमदार 10 = 65 आमदार

राष्ट्रवादी काँग्रेस

१. रामराजे नाईक निंबाळकर

२. एकनाथ खडसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार 51 + अपक्ष 3 = 54 ( MIMच्या एका आमदाराने NCP ला समर्थन जाहीर केले आहे. )

काँग्रेस

१. चंद्रकांत हंडोरे

२. भाई जगताप

काँग्रेसचे 44 आमदार आहेत. त्यांना दुसरा उमेदवार जिंकून आणन्यासाठी 10 मतांची आवश्यकता आहे.