आमदार संजय बनसोडे यांनी घेतला, जलसंपदा विभागाच्या कामाचा आढावा
मतदार संघातील तिरु मध्यम प्रकल्पासह विविध कामे तात्काळ करण्याच्या सुचना
उदगीर : मतदार संघातील विविध गावातील साठवण तलाव, सिंचन तलाव व तिरू मध्यम प्रकल्प या सह विविध ठिकाणी असलेल्या त्या – त्या परिसरातील तलावांची माहिती घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवितास धोकादायक असणाऱ्या तलावाची तात्काळ दुरुस्ती करावी अशा सूचना उदगीर जळकोट मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत.
आ.बनसोडे जलसंपदा विभागाच्या विविध कामांच्या लातूर येथे अधिक्षक अभियंता कार्यालयात आयोजीत आढावा बैठकीच्या वेळी अधिकाऱ्यांना बोलत होते.
या बैठकीमध्ये आमदार संजय बनसोडे यांनी प्रामुख्याने तिरु मध्यम प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन गेट दुरुस्ती करणे.
तिरु प्रकल्पावरील डावा आणि उजवा कालावा काढुन शेतकऱ्यांना पाईप लाईनव्दारे पाणी देणे.
चोंडी साठवण तलावाची सुधारित मान्यता घेणे. घोणसी सिंचन तलाव धोकादायक झाला असून त्या तलावाची व कालव्याची दुरुस्ती करणे, मागील काळात तिरु मध्यम प्रकल्पाच्या उंची मध्ये वाढ केली होती.
मात्र रिसेक्शन केले नाही ते करणे, तिरू मध्यम प्रकल्पाची उंची वाढल्याने या भागातील हंडरगुळी आणि आडोळवाडी रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे.
उदगीर तालुक्यातील धडकनाळ बोरगाव या गावात पावसाळ्यात पुराचे पाणी गावात शिरते या पुराच्या पाण्यापासून या भागातील ग्रामस्थांचे संरक्षण व्हावे म्हणून पूर नियंत्रण कार्यक्रमांतर्गत संरक्षण भिंत करणे.
उदगीर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाचे इमारतीसह तेथील जागेवर सुरक्षा भिंतीचे बांधकाम करणे.
जळकोट तालुक्यातील सोनवळा साठवण तलावास जोडणारा रस्ता अद्याप झाला नसल्याने तेथे जाण्यासाठी गैरसोय होत आहे तो रस्ता तात्काळ करणे.
जलसंपदा विभाग अंतर्गत येणाऱ्या पाझर तलावांची दुरुस्ती करण्यासाठी जलसंधारण विभागास हस्तांतर करणे, त्यानंतर तिरू मध्यम प्रकल्पाच्या कालव्यावरील पाईपलाईन करणे.
केसगिरवाडी सिंचन तलावास जोडणारा रस्ता दुरुस्त करणे, डाऊळ साठवण तलावाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे डांगेवाडी शिवारात जोडणारा रस्ता सतत पाण्याखाली जात असतो.
त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास होत असल्याने त्या ठिकाणी पुल उभारण्यात यावा, तेरु मध्यम प्रकल्पावर विद्युत पोल बसून रुमचे बांधकाम करणे.
वाढवणा येथील तिरु मध्यम प्रकल्प कार्यालयाच्या भोवती सुरक्षा भिंतींचे बांधकाम करुन तिरु मध्यम प्रकल्पावर विश्रामगृह आणि वसाहत बांधणे.
यासंबंधी या आढावा बैठकीत आमदार संजय बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
या आढावा बैठकीस अधिक्षक अभियंता म्हेत्रॆ अभिजित, कार्यकारी अभियंता रोहित जगताप, कार्यकारी अभियंता महेंद्र काळे, कार्यकारी अभियंता जेवळीकर, कार्यकारी अभियंता अनिल कांबळे, यांच्यासह वाढवणा गटाचे माजी जि.प. सदस्य तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. कल्याण पाटील, प्रा.श्याम डावळे, महेताब बेग, हणमंतराव पाटील आदी उपस्थित होते.