Mild Earthquakes : लातूर | जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी गावाला आज पहाटे 3.38 वाजता 2.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा सौम्य धक्का बसला. यापूर्वी दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत.
राष्ट्रीय पृथ्वी मंत्रालयाचे भूवैज्ञानिक अजय कुमार शर्मा यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून या परिसरात जमिनीवरून येणाऱ्या गूढ आवाजाचे गूढही उलगडले असून, या आवाजामागील भूकंपाचे सौम्य धक्के असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र हे धक्के सौम्य आहेत, त्यामुळे घाबरण्याचे कारण नसले तरी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हासोरी परिसरात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून जमिनीतून गूढ आवाज येत असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. हे आवाज नेमके कशामुळे होत आहेत हे समजत नव्हते.
मात्र, भूगर्भातील हालचालींमुळे हे आवाज येत असावेत, असा कयास होता. मात्र, येथील भूकंप केंद्रात भूकंपाची नोंद नाही. त्यामुळे या आवाजाचे गूढ उकलण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूगर्भ संकुलाचे पथक हासोरी येथे पोहोचले होते.
दिल्लीहून एक पथक काल हासोरीमध्ये दाखल झाले. त्यांनी या क्षेत्राचा अभ्यास केला आहे. हासोरी, औराद शहाजानी आणि आशिव येथे सिस्मोमीटर बसविण्यात आले आहेत.
12 सप्टेंबर रोजी 2.2 रिश्टर स्केलचा आणि 15 सप्टेंबर रोजी 1.3 रिश्टर स्केलचा सौम्य भूकंप हासोरी आणि त्याच्या परिसरात जाणवला, तर आज 23 सप्टेंबर रोजी पहाटे 3:38 वाजता 2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
या भूकंपाचा केंद्रबिंदू हासोरी परिसरात भूगर्भात 5 किमी अंतरावर असल्याची माहिती स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा विद्यापीठातील भूविज्ञान संकुलाचे प्रमुख प्रा.अविनाश कदम यांनी दिली.