Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार | मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? कोण मंत्री होणार? कोणाचा पत्ता कट होणार या प्रश्नाची उत्तर उद्या मिळणार आहेत. कारण बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अखेर निश्चित झाली आहे.
उद्या (दि.9 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. सर्व काही ठरले असून शक्य झाल्यास आज रात्रीपर्यंत शपथविधी सोहळा पार पडू शकतो, असे वृत्त आहे.
पहिल्या टप्प्यात 10 ते 15 मंत्री शपथ घेणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे स्वच्छ प्रतिमा असलेल्या आमदारांनाच मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपकडून ज्येष्ठ मंत्र्यांना संधी मिळू शकते. तर शिंदे गटातून सहा ते सात जण शपथ घेऊ शकतात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे निवासस्थान नंदनवनात देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहेत.
दुसरीकडे विधिमंडळातही सचिवांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक असल्याचे बोलले जात आहे.
कुणाच्या नावाची चर्चा?
भाजपकडून ज्येष्ठ मंत्र्यांना संधी देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात भाजप ज्येष्ठ मंत्र्यांना शपथ देण्याची शक्यता आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे.
याशिवाय पहिल्या टप्प्यात नितेश राणेंना संधी मिळू शकते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे आशिष शेलार प्रदेशाध्यक्ष होतात की मंत्री होतात हे पाहावे लागेल.
आशिष शेलार यांना पहिल्या यादीत स्थान न देता प्रदेशाध्यक्षपदी संधी दिली जाऊ शकते. याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. याशिवाय मुंबईचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनाही पहिल्या यादीत संधी मिळण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाकडून सहा ते सात जणांना थपथ
शिंदे यांच्या गटातील यापूर्वीच्या नऊ मंत्र्यांना संधी देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मात्र मिळालेल्या माहितीनुसार सहा ते सात जण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन ते तीन नावे वगळली जाऊ शकतात.
स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना स्थान द्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्यांनाच संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर चर्चेचे कारण म्हणजे अब्दुल सत्तार हे टीईटी घोटाळ्यात आरोपी होते. त्यामुळे पहिल्या यादीतून त्यांचे नाव वगळले जाण्याची शक्यता आहे.
इच्छुकांच्या यादीवर एक नजर
– उद्धव ठाकरेंसोबतचे आठ मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत. दादा भुसे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, उदय सामंत, अब्दुल सत्तार, शंभूराजे देसाई, राजेंद्र यड्रावकर, संजय राठोड
– संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, विश्वनाथ भोईर, संजय गायकवाड, संजय रायमुलकर, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, सुहास कांदे, अनिल बाबर, प्रकाश आबिटकर
मंत्रिमंडळ विस्तार शिंदेंची डोकेदुखी?
जुन्यांना संधी दिली तर नवीन नाराज? नव्यांना संधी दिली तर जुने काय करणार? 50 पैकी किती जणांना न्याय मिळेल? असे एक ना अनेक प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर उभे ठाकले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून बराच काळ लोटला आहे, त्यामुळे शिंदे यांच्या आमदारांमध्ये कुजबुज सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाचा समावेश होणार हे गुपितच आहे.
त्यामुळे शिंदे यांचे आमदार शिंदे यांची पाठ सोडत नाहीत, काही आमदार मतदारसंघाऐवजी नेहमीच शिंदे यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे विस्तार हा शिंदे यांच्यासाठी तापदायक ठरला आहे.