लातूर : जिल्ह्यातील शेतकरी पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. उदगीर तालुक्यात खरीपाचे एकूण क्षेत्र 64 हजार 300 हेक्टर असून त्यातील 44 हजार 570 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो.
यासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार खते व बियाणे वेळेत उपलब्ध् करुन देण्याचे निर्देश संबंधीतांना राज्यमंत्री बनसोडे यांनी दिले. यावर्षी मान्सून लवकर येऊन खरीपाच्या पेरण्या वेळेवर होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.
उदगीर तालुक्यातील शेतकऱ्याचे नगदी पिक सोयाबीन असून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये अवलंब करुन उत्पादन व उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करावेत असे आवाहन करुन शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार व गुणवत्तापुर्ण बियाणे व रासायनिक खते उपलब्ध् करुन देणे बाबतच्या सुचना संबंधीत कृषी अधिकारी यांना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.
निकृष्ट दर्जाची कृषी निविष्ठा तालुक्यात आढळून आल्यास संबंधीत कंपनीवर नियमाप्रमाणे कठोर कार्यवाही करणे बाबत आदेशीत केले.खरीप हंगामामध्ये दर्जेदार कृषी निविष्ठाची साठवणूक होणार नाही, या करीता भरारी पथकाची स्थापना करुन तालुका स्तरावर 24 तास तक्रार निवार कक्षाची स्थापना करुन शेतकऱ्यांच्या अडचणी वेळेत सोडविण्याच्या सुचना दिल्या.
शेतकऱ्यांनी अधिक उत्पादनाकरीता युरिया, सिंगल सुपर फॉस्पेरेट (SSP)/ पोटॅश 20:20:0:13, 18:18:10, 10:26:26 या खताचा योग्य कृषी शास्त्रीय पध्दतीने पिकास वापर केल्यास डी.ए.पी. च्या वापरापेक्षा अधिक उत्पन्न मिळते. याबाबतचा प्रचार आणि प्रसार शेतकऱ्यांमध्ये करण्याच्या सुचना कृषी अधिकारी यांना दिल्या.
दुबार पेरणीचे संकट टाळण्याकरीता तालुक्यात पेरणी योग्य म्हणजे 70 ते 100 मि.मी. पाऊस झाल्यासच बियाण्याची बिज प्रक्रिया व त्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करुन शेतकऱ्यांनी अर्थिक उत्पन्न वाढविण्याचे आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.