Online Delivery Boy : सध्या ऑनलाइन वस्तू मागविण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. विशेषतः महिला ऑनलाईन वस्तू मागवतात. त्यात कपडे, घरगुती सामान, औषधी, सौंदर्य प्रसाधने असतात.
मात्र कधी कधी वस्तू खराब किंवा बरोबर मापाची येत नाही, तेव्हा ती बदलून घेण्यासाठी-देण्यासाठी डिलिव्हरी बॉय सोबत संपर्क येतो. मात्र अलीकडच्या काळात डिलिव्हरी बॉय बद्दल अनेक धक्कादायक गोष्टी ऐकायला व वाचायला मिळत आहेत.
वस्तू परत घेण्यासाठी आलेल्या या डिलिव्हरी बॉयने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, डिलिव्हरी बॉयने महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला किंवा मुलीचे जबरी चुंबन घेतले, या घटना सोशल मिडिया व मीडियातून पाहिल्या व वाचल्या असतील.
तुम्हाला दररोज नजरेसमोर येणाऱ्या बातम्या माहित असाव्यात. पण ही घटना घडण्यापूर्वी किंवा घडल्यानंतर तुम्ही कधी विचार केला आहे का, की ही घटना वारंवार समोर येण्याचे कारण काय आहे? यासाठी काय केले पाहिजे. कळत न कळत आपणच जबाबदार आहोत का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
जर याचा कधी विचार केला नसेल तर हा लेख काळजीपूर्वक वाचा. चला तर मग जाणून घेऊया. डिलिव्हरी बॉय आणि तुम्ही दिलेल्या डीटेल्स आणि माहितीचा काय संबंध आहे? हा लेख काळजीपूर्वक वाचा आणि तुम्हीच निर्णय घ्या.
केव्हाही ही चूक करू नका
तुम्ही कधी हे लक्षात घेतले आहे का की तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट ऑनलाइन ऑर्डर करता तेव्हा तुमच्याकडून कोणत्या आणि कसल्या चुका होतात?
तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करताना कळत न कळत सहजपणे ऑर्डर करत असलेल्या वस्तूंच्या ऑर्डर सोबत अनेक प्रकारची प्रायव्हेट माहिती देता हे तुम्ही शेअर करीत असता हे विसरता.
तेव्हा यापुढील काळात ऑर्डर करताना तुमची माहिती देताना विचार करा. जेव्हा ऑर्डर कराल, तेव्हा काही माहिती शेअर करणे टाळू शकते.
पत्ता आणि फोन नंबर
तुम्ही कोणत्याही वस्तूची ऑर्डर देता तेव्हा, तुम्ही तुमचा पूर्ण पत्ता आणि फोन नंबर अशा कंपनीसोबत शेअर करता ज्याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नसते. फक्त पत्ता आणि नंबर देणे एवढेच काम नाही.
तुम्ही दिलेली माहिती कितपत सुरक्षित राहू शकते, याचा विचार तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करताना जरूर केला पाहिजे. काहीवेळा असे होते की तुम्ही दिलेली माहिती एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीला विकली जाते किंवा तिचा गैरवापर होऊ शकतो.
तुम्ही कोणत्याही वस्तूची ऑर्डर देता विशेषतः महिलांनी आपल्या मुलाचा, भावाचा किंवा पतीचा मोबाईल नंबर द्यावा.
घरचा पत्ता न देता ऑफिस किंवा स्वतःचे ऑफिस नसेल तर मैत्रिणीच्या अथवा आपल्या ओळखीच्या ठिकाणी डिलेव्हरी होईल असा पत्ता द्यावा.
जर वस्तू जास्तीचं खाजगी असेल तर पत्ता देताना मोबाईल नंबर देताना काळजी घ्या. स्पॅम किंवा फिशिंग कॉल येऊ लागले तर लगेच सावध व्हा.
घरी कोणी नसताना डिलेव्हरी बॉयला बोलावू नका, जर बोलावले तर घरची एखादी व्यक्ती किंवा शेजारच्या मैत्रिणीला जवळ बोलवा.
या मार्गाचा अवलंब करा
महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा मोठा वाद होऊ शकतो. एखाद्या महिलेने किंवा मुलीने आपला फोन नंबर किंवा पत्ता दुसऱ्या अज्ञात व्यक्तीला द्यावा किंवा देऊ नये, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
कधी-कधी महिलांना एकटं पाहून कंपनीचा डिलिव्हरी बॉय गैरकृत्य करतो, जे मोठ्या घटनेत बदलते. तेव्हा त्या व्यक्तीकडे तुमचा फोन नंबर आणि पत्ता असल्याने तुमच्या सुरक्षिततेचा प्रश्न नक्कीच निर्माण होतो.
तेव्हा शक्यतो मोबाईल नंबर घरातील व्यक्तीचे द्या किंवा घरातील एकचं नंबर ऑनलाईन खरेदी साठीच वापरा. बाकीच्या सदस्यांनीही तोच नंबर वापरावा. घरातील प्रत्येकाचा नंबर कंपनीकडे देऊ नका.
बातम्यांकडे लक्ष द्या, सावध व्हा
वस्तू परत घेण्यासाठी आलेल्या या डिलिव्हरी बॉयने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, त्या कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या बातम्या आल्या नाहीत असा एकही दिवस जात नाही.
तेव्हा या बातम्याचे विश्लेषण करा, त्याच्यातून काहीतरी शिका, त्या चुका नक्की टाळता येतील. ऑनलाईन खरेदी घरातील सर्व सदस्यांच्या उपस्थित व डिलेव्हरी सोयीच्या वेळेत घ्या.
ऑनलाईन फूड डिलेव्हरी असेल तर रात्री खूप उशिरा मागवू नका. घरी कोणी नसेल तर आज बाजूला कोणीतरी असावे याची खबरदारी घ्या.
तुमची सवय बदला
तुम्ही पुढच्या वेळी ऑनलाइन ऑर्डर केल्यास, तुमच्या भावंडाचा किंवा इतर कोणत्याही पुरुष सदस्याचा फोन नंबर द्या. या छोट्या गोष्टींमुळेच अशा घटनांचे प्रमाण कमी होऊ शकते.
डिलेव्हरी बॉय समोर व्यवस्थित कपडे परिधान करून जा, हा सल्ला कदाचित चुकीचा वाटेल, पण कोणाच्या मनात काय सुरु आहे हे कोणाला कळत नाही.
घरात एकटे असताना डिलेव्हरी बॉयला चहा, पाणी ऑफर करू नका. पाणी मागितले तर देताना काळजी घ्या. घरात एकट्या असताना चुकूनही आत घेऊ नका.
तुमच्या मोबाईलवर अनोळखी कॉल येऊ लागले, Whatsapp ला मेसेज येऊ लागले तर काही दिवस लक्ष ठेवा, तुमचा मोबाईल नंबर कोणाच्या तरी हातात पडण्याची शक्यता जास्त आहे.
या काही गोष्टींची काळजी घेतली तर अनेक गैर कृत्यांना आळा घालू शकतो. ऑनलाइन खरेदी आवश्यक असली तरी त्यात धोका पत्करू नका. सुरक्षित रहा. जपून माहिती शेअर करा.