सर्वात मोठी बातमी : चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक, प्रचंड गदारोळ, नेमके काय घडले?

Ink thrown at Chandrakant Patil in Pune

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी शहरात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली.

चंद्रकांत पाटील यांनी काल महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सारख्या महापुरुषांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी भीक मागितली, असे धक्कादायक विधान त्यांनी केले होते.

त्यांच्या या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. पिंपरीत त्यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटील हे आज पिंपरीतील मोरया गोसावी गणेश मंदिराच्या संजीवन समाधी सोहळ्याला जाणार होते. दरम्यान, चंद्रकांत पाटील एका कार्यकर्त्याच्या घरी आले असता त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने शाई फेकली.

विशेष म्हणजे अशी घटना घडू शकते असा संशय पोलिसांना आधीच होता. त्यामुळे संबंधित कार्यकर्त्याच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही ही अनपेक्षित घटना घडली.

चंद्रकांत पाटील यांनी काल एका कार्यक्रमात शाळांबाबत बोलताना वादग्रस्त विधान केले होते. मात्र ते विधान चुकून झाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते.

आपल्याला लोकवर्गणी म्हणायची होती, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र त्यांच्या वक्तव्याविरोधात समता परिषद आक्रमक झाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पाटील यांच्यावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली. शाई फेकणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शाईफेक केल्यानंतर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस व कार्यकर्ते आमने सामने आल्याचे पहायला मिळाले.