परभणी : परभणीत एकाच दिवशी पाच वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे पाचही घटनांमध्ये दुचाकीस्वार अपघाताचे बळी ठरले.
या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवनाथ भगवान सानप आणि आसाराम सांगळे अशी दोन मृतांची नावे असून तिसर्याचे नाव समजू शकले नाही.
जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पाच अपघातात तिघांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
पहिला अपघात परभणीच्या जिंतूर जालना महामार्गावर बुधवारी मध्यरात्री झाला. भरधाव ट्रकचालकाने दुचाकीवरील एकाला चिरडले. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ज्ञानेश्वर राठोड आणि प्रमोद राठोड अशी जखमींची नावे आहेत.
जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
जिंतूर-औंढा मार्गावर कार आणि दुचाकी यांच्यात दुसरा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तिसरा अपघात सोनापूर तांडा येथे झाला.
ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. चौथा अपघात अकोली पुलाजवळ घडला, दुचाकीच्या अपघातात एक जण गंभीर जखमी.
पाचवा अपघात शेवडी पाटीजवळ सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीला झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. सर्व जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.