मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ उठलंय. महाविकास आघाडी सरकार राहणार की जाणार? एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव मान्य करुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुन्हा भाजपसोबत जाणार का? असा सवाल विचारला जात होता.
मात्र, शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेच्या (Shivsena) मदतीसाठी आता खुद्द शरद पवार उतरले आहेत. त्यामुळे अनुभव आणि कायदा या दोन कसोट्यांवर हे बंड मोडित काढण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आलाय.
दुसरीकडे आमची शिवसेना खरी आणि आम्हीच खरे शिवसैनिक असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवा पेच निर्माण झालाय.
आमदारांवरील अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी विलिनीकरण हाच एकमेव पर्याय शिंदेंसमोर असल्याचं कळतंय.
भाजप किंवा प्रहारमध्ये विलीनीकरणाचा पर्याय!
शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आलीय.
आमदारांवरील अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी विलीनीकरण हाच पर्याय असल्याचं बोललं जात आहे. संविधानाच्या 10 व्या अनुसूचीच्या परिच्छेद 4 नुसार वेगळा गट स्थापन होऊ शकत नाही.
त्यामुळे त्यांना भाजप किंवा प्रहारमध्ये गटाचं विलीनीकरण करण्याचा पर्याय शिल्लक असल्याचं कायद्याचे अभ्यासक सांगतात.
त्यामुळे एकनाथ शिंदे आता कोणता निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बच्चू कडूंना बंडाळीची माहिती आधीच होती?
महत्वाची बाब म्हणजे विधान परिषद निवडणुकीवेळी बच्चू कडू यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे बच्चू कडू यांना तेव्हाच या बंडखोरीची माहिती होती का? असा सवाल विचारला जातोय.
बच्चू कडू म्हणाले होते की, आता येणारा काळ हा अपक्ष आणि लहान पक्षांचाच राहणार आहे. आम्ही बोलू तसंच सरकार चालणार आहे. म्हणून त्याचा झटका, परिणाम या निवडणूक दिसणार आहे.
महाविकास आघाडीच्या बाजूला राहून दुसऱ्या पक्षाला फटका बसेल. पुढच्या वेळेस आमचंच म्हणजे प्रहारचं राज्य येणार आहे. पुढचा मुख्यमंत्री प्रहारचा असेल, असं कडू म्हणाले होते.
नीलम गोऱ्हेंनीही सांगितलं होतं
तर शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही महत्वाची माहिती दिली होती.
शिवसेना हे मुळच्या पक्षाचं नाव त्यांना वापरता येणार नाही, हे स्पष्ट आहे. म्हणून मी बोलताना सांगितलं की त्यांना फार तर भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल किंवा बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेत विलीन व्हावं लागेल.
बाहेर जो गैरसमज पसरवला जातोय की शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह त्यांना मिळणार, हे चुकीचं असल्याचंही नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आहे.