आजची कविता : गर्जे नाम घोष जय हरी बोला

198

आषाढी वारी

*****

आषाढी वारीला
पायी पंढरीला
गर्जे नाम घोष
जय हरी बोला…

मृदुंग वाजती
चिपळ्या बोलती
भजन साथीला
टाळ वीणा हाती…

अबीर गुलाल
चंदन ऊटीला
गोपीचंद नाम
माथा लावी टिळा…

पवित्र तुळशी
डोई वृंदावन
राम कृष्ण हरी
भजनी तल्लीन…

पांडुरंग हरी
वासुदेव हरी
तल्लीन होऊनी
आठवी श्रीहरी…

विठू माय बाप
ध्यान जप तप
विठू निवारंतो
दु:ख भव ताप…

सावळा पाहून
सुखावेल मन
होय पुर्ण आस
देखता चरण…

विठ्ठलाचे नामी
सोहळा सुखाचा
जाता वारी लाभे
ठेवा आनंदाचा …

ज्योती जयंतराव आळंदकर
लातूर