कारखाने भाडे तत्वावर घेऊन हडप करण्याचा देशमुखांचा डाव फसला; जाधवांचा आरोप

निलंगा : शेतकऱ्यांच्या मालकीचे असलेले अंबुलगा ता. निलंगा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर व नळेगाव येथील जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाण्याची (Sugar Factory) भाडेतत्वावरील सध्याची टेंडर प्रक्रिया राज्य सहकारी बँकेने रद्द केली असून हे कारखाने भाडे तत्वावर घेऊन हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांचा डाव फसला आहे.

भाडेतत्वावरील टेंडर प्रक्रिया रद्द करून प्रशासक मंडळाने नवीन निविदा प्रक्रिया परत मागवली असल्याची माहीती कामगार नेते तथा माजी आमदार माणिक जाधव (Manik Jadhav) यांनी दिली आहे.

आंबुलगा ता. निलंगा येथे माजी मुख्यमंत्री डॅा. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून सहकारी तत्वावर कारखाना सुरू केला होता.

हा कारखाना 2007 पर्यंत चालला मात्र नैसर्गिक आपत्ती व अर्थिक अडचणीमुळे हा कारखाना बंद पडला होता. शिवाय अवसायनात निघालेले कारखाण्याची विक्री न करता भाडेतत्वावर सुरू व्हावे म्हणून याबाबत राज्य सहकारी बँकेने हा कारखाना ताब्यात घेऊन भाडेतत्वावर चालवण्यासाठी अनेकवेळा निविदा प्रक्रिया मागवली होती.

मात्र याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे मागील महिण्यात २ मार्च रोजी अंबुलगा ता. निलंगा येथील डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर व नळेगाव येथील जय जवान कारखान्यासाठी निविदा मागवली होती.

मात्र दोन्ही कारखाने भाडे तत्वावर द्यायचे असेल तर किमान तीन निविदा भरणे व मागवणे बंधनकारक असताना लातूर येथील देशमुख परिवारातील ट्वेंटीवन कारखान्याची एकच निविदा भरली होती.

त्यामुळे हे दोन्ही सहकारी तत्वावरील कारखाने आपल्यालाच मिळाली म्हणून प्रक्रियाचे करार पूर्ण न होताच गुढी पाडव्याच्या मुर्हतावर शिवाजीराव पाटील निलंगेकर व जय जवान कारखाने ट्वेंटीवन शुगर मिलने भाडे तत्वावर घेतल्याचा मोठा गाजावाजा करत दोन्ही कारखान्याच्या मशनरीचे पुजन करून जिल्ह्यात एक वेगळे राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न पालकमंत्री अमित देशमुख व त्यांचे बंधू धिरज देशमुख यानी केला.

तसेच, लाखो लोकांच्या पैशावर ऊभा असलेली लातूर जिल्हा बँकेचा दुरउपयोग करत मोठ्या प्रमाणात नियमबाह्य कर्ज घेऊन सार्वजनिक मालमत्ता समजून जागृती व ट्वैंटीवन हे दोन साखर कारखाने खाजगी तत्वावर चालवत असून शेतकऱ्यांच्या शेअर्सवर ऊभा केलेले कारखाने स्वताच्या घशात घालण्याचा डाव सध्या देशमुख परिवार करत आहेत, असा आरोप माजी आमदार माणिक जाधवांनी केला आहे.

तर दोन्ही कारखाने भाडे तत्वावर न देता शेतकऱ्यांना चालवण्यासाठी द्या, अशी मागणीही राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याच्याकडे आपण यापूर्वीच केली होती असे जाधव यांनी सांगितले.

ट्वैंटीवन कारखान्याला निलंगेकर सहकारी साखर कारखाना व जय जवान जय किसान हे दोन्ही कारखाने भाडे तत्वावर देण्यासाठी कोणताच करार झाला नसताना देखील पालकमंत्री देशमुख यांनी मशनरीचे पुजन करून काय साध्य करायचे होते?, असा प्रश्न जाधवांनी केला आहे.

२० एप्रिल रोजी राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनासकर व कार्यकारी संचालक अजित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली व या बैठकीत शिवाजीराव पाटील निलंगेकर व जय जवान जय किसान सहकारी कारखाना भाडे तत्वावर देण्याची प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याशिवाय ट्वैंटीवन कारखान्याला भाडे तत्वावर देण्याचा कुठलाच करार झाला नाही, अशीही माहिती जाधव यानी दिली.

संबंधित दोन्ही कारखान्याला बँकेचे कुलूप असताना कोणत्या अधिकाराने त्यानी ते तोडून मशनरीचे पूजन केले, असा सवाल देशमुखांना जाधव यांनी केला आहे.

तसेच, संबंधित दोन्ही कारखान्याची टेंडर प्रक्रिया निविदा नव्याने मागवल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

लातूर जिल्ह्यातील शिवाजीराव पाटील निलंगेकर, जय जवान सहकारी कारखाना व किल्लारी येथी शेतकरी सहकारी साखर कारखाने हजारो शेतकऱ्यांच्या मालकीचे असून हे कारखाने शेतकरी सभासदांच्या ताब्यात देऊन कायमस्वरूपी पूनर्वसन करा अन्यथा मोठे जन आंदोलन ऊभा करू शिवाय जिल्ह्यातील कोणताच कारखाना भाडे तत्वावर देऊ देणार नाही, असा इशारा देत जागृती सहकारी साखर कारखाना व ट्वैंटीवन हे दोन कारखाने कसे ऊभा केले याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जाधवांनी यावेळी केली आहे.

शिवाजीराव पाटील निलंगेकर या कारखान्याचे १२ हजार सभासद आहेत तर जय जवान कारखान्याचे १० हजार सभासद आहेत व किल्लारी कारखान्याचे २० हजार सभासद आहेत.

संपूर्ण शेतकऱ्यांच्या पैशावर ऊभा केलेले कारखाने शेतकऱ्यांच्या ताब्यात देऊन सभासद शेतकऱ्यांना मालकी द्या अन्यथा भविष्यात जन आंदोलन ऊभा करू, असा इशारा जाधव यानी दिला आहे.