महिला पोलीस उपनिरीक्षकाची शासकीय निवासस्थानी आत्महत्या; पोलीस दल हादरले

अमेठी : अमेठी जिल्ह्यातील मोहनगंज पोलीस ठाण्याच्या महिला चौकीच्या प्रभारी उपनिरीक्षकाने शासकीय निवासस्थानी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महिला निरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

रश्मी यादव असे आत्महत्या करणाऱ्या महिला उपनिरीक्षकाचे नाव आहे. रश्मी यांची 2017 मध्ये उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली होती.

त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची 2018 मध्ये अमेठी जिल्ह्यात नियुक्ती झाली.

जगदीशपूर आणि गौरीगंजसह अनेक पोलिस ठाण्यात पोस्टिंग केल्यानंतर, मार्च 2021 मध्ये त्यांची मोहनगंज येथे बदली झाली.

येथे रश्मी यादव यांच्याकडे महिला हेल्प डेस्क प्रभारी यांच्यासह महिला चौकीची जबाबदारी देण्यात आली होती.

वॉर रुमच्या तयारीसाठी रश्मी ह्या शुक्रवारी सीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत आणि कर्मचाऱ्यांसह उपस्थित होत्या.

वॉर रूमचे कामकाज संपल्यानंतर त्या दोनच्या सुमारास त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेल्या.

दरम्यान दुपारी तीन वाजता एएसपी विनोदकुमार पांडे यांच्या तपासणीची माहिती देण्यासाठी कार्यालयात उपस्थित असलेले कर्मचारी रश्मी यांना बोलावण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले.

त्यांनी बराच वेळ घराचा दरवाजा ठोठावला मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी या कर्मचाऱ्याने रश्मी यांच्या मोबाईलवर अनेकदा फोनही केले.

मात्र त्यालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही यानंतर या कर्मचाऱ्याने संपूर्ण प्रकरणाची माहिती प्रभारी निरीक्षक अमर सिंह यांना दिली.

माहिती मिळताच प्रभारी निरीक्षक सहकारी पोलिसांसह त्यांच्या खोलीत पोहोचले आणि दरवाजा तोडला, त्यानंतर खोलीत पंख्याच्या सहाय्याने रश्मी फासावर लटकलेल्या पाहून सर्वांनाच धक्का बसला.

दरम्यान, रश्मी यांच्या वडिलांनी आत्महत्या नसून हत्या असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. रश्मी यांना घरून कोणतीच अडचण नव्हती.

मात्र त्या पोलिस स्टेशनच्या कामात नक्कीच काहीतरी अडचणीत होत्या. बदली झाली तर बरे होईल असे तिने घरात बोलून दाखवल्याचे त्यांच्या वडिलांनी सांगितले आहे.