मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्यांचेही वाटप करण्यात आले आहे. पक्ष संघटनेत स्वत:चा प्रभाव निर्माण केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव खातेवाटपातही दिसून येत आहे.
या खातेवाटपात फडणवीस समर्थकांना चांगलीच खाती देण्यात आली आहेत. ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात घेऊन त्यांना पूर्वीपेक्षा दुय्यम दर्जा देण्यात आला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्याकडे यावेळी उच्च व तंत्रशिक्षण खाते देण्यात आले आहे. त्यांना चांगले खाते मिळेल, असे सांगण्यात येत होते. मात्र त्यांना ‘विशेष’ महत्त्वाचे खाते देण्यात आलेले नाही.
त्यामुळे चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होताच चंद्रकांत पाटील यांचे पक्षातील वजन कमी झाले की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे राज्याचे अर्थमंत्रीपद भूषविणारे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन खाते देण्यात आले आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांचेही पंख फडणविसांनीच कापल्याचे बोलले जात आहे.
चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार यांना दिलेली खाती फडणवीसांच्या ‘धक्का’ तंत्रानुसार दिली असून जाणीवपूर्वक खातेवाटप केल्याची बोलले जात आहे.
आधी काय आणि आता काय?
यापूर्वी आघाडी सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वित्त आणि वनखाते होते. त्यामुळे यावेळी त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
मात्र, मुनगंटीवार यांच्याकडे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय खाते देण्यात आले आहे. मुनगंटीवार यांना दुय्यम दर्जाचे खाते देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागील सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खाते होते. त्यामुळे त्यांना महसूल खाते देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात येत होते. चंद्रकांतदादा माजी प्रदेशाध्यक्ष आहेत.
चार दिवसांपूर्वी त्यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागले होते. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना मोठा मोबदला मिळणार असल्याचे संकेत होते. मात्र पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कामकाज ही खाती देण्यात आली आहेत.
समर्थकांकडे लक्ष
या खातेवाटपात फडणवीस समर्थकांना चांगलीच खाती देण्यात आली आहेत. गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा, अतुल सावे या फडणवीस समर्थकांना चांगली खाती देण्यात आली आहेत.
पक्षात आणि मंत्रिमंडळातही सर्वोच्च
चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बावनकुळे हे फडणवीसांचे कट्टर समर्थक मानले जातात. बावनकुळे यांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती करून फडणवीस यांनी पक्षावरील पकड मजबूत केली आहे.
त्यामुळे मंत्रिमंडळात प्रतिस्पर्ध्यांना दुय्यम दर्जा देऊन आणि समर्थकांसाठी लाल गालिचा अंथरून मंत्रिमंडळात स्वत: वरचढ असल्याचे दाखवून दिले आहे.
कुणाला कोणतं खातं
राधाकृष्ण विखे-पाटील: महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
सुधीर मुनगंटीवार: वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
चंद्रकांत पाटील: उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
डॉ. विजयकुमार गावित: आदिवासी विकास
उदय सामंत: उद्योग
प्रा.तानाजी सावंत: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र चव्हाण: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
अब्दुल सत्तार: कृषी
गिरीष महाजन: ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
गुलाबराव पाटील: पाणीपुरवठा व स्वच्छता
दादा भुसे: बंदरे व खनिकर्म
संजय राठोड: अन्न व औषध प्रशासन
सुरेश खाडे: कामगार
मंगलप्रभात लोढा: पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास
संदीपान भुमरे: रोजगार हमी योजना व फलोत्पादन
दीपक केसरकर: शालेय शिक्षण व मराठी भाषा
अतुल सावे: सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज देसाई: राज्य उत्पादन शुल्क