Congress President Election : नव्या अध्यक्षांना काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही, तर आम्ही आवाज उठवत राहू; पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांचा अर्ज दाखल करताना, G23 गटातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की G23 गटाचा विरोध मावळला का?

खरगे यांच्या अध्यक्षपदाला या ‘G23’ नेत्यांचा पाठिंबा आहे. मात्र नव्या अध्यक्षांना कामच करायची संधी न दिल्यास यापुढेही आवाज उठवणार असल्याचा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या नूतन अध्यक्षांना काम करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. आम्हाला आशा आहे की त्यांना काम करायची संधी मिळेल, पण तसे झाले नाही तर आवाज उठवत राहावे लागेल.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या हालचाली सुरू असताना एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अनेक महत्त्वाची विधाने केली आहेत.

पक्षहितासाठीच आम्ही काम करत आहोत : पृथ्वीराज चव्हाण

G-23 गटाचे असल्याचा आरोप करून आम्हाला बंडखोर ठरवण्याचा प्रयत्न झाला. मात्र आम्ही पक्षाच्या हितासाठी हे करत होतो.

आम्ही आवाज उठवल्यानंतरच इतक्या वर्षांनी पक्षाची विचारविनिमय बैठक झाली. आताही अध्यक्ष निवडला जातोय, तो आमच्या प्रयत्नामुळे निवडला जातोय, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

भारत जोडो यात्रेवर चव्हाण यांचे मत

एकीकडे पक्षाच्या दृष्टीने चांगले चालले असतानाच सध्याच्या भारत जोडो यात्रेबाबत त्यांचे वेगळे मत आहे. यात्रेचा मार्ग ठरवताना निवडणुका होणार्‍या राज्यांना वगळण्याची काहीही गरज नव्हती. त्यामुळे चुकीचा संदेश जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

भूकंपाच्या चर्चेवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच भूकंप होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, भूकंपाची चर्चा माध्यमांमध्ये खूप दिवसांपासून होत आहे.

मात्र तसे झाले नाही. भारत जोडो यात्रा मध्य महाराष्ट्रातून जात आहे. ती सर्व भागांतून गेली असती तर बरे झाले असते. महाराष्ट्राला त्याचा किती फायदा होतो हे भविष्यात कळेल.

कोण जात असेल तर त्याला रोखण्याचे कारण नाही. त्याला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो तो घेईल. राज्यात भाजप सध्या सर्वोच्च न्यायालयात अस्थिर परिस्थितीचा सामना करत आहे.

त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तारही करता येत नाही. हे सरकार कसे चालले आहे ते आपण पाहतोय. ज्या प्रक्रियेतून हे सरकार स्थापन झाले आहे, ती लोकांना आवडलेली नाही. त्यामुळे त्यांना सरकार चालवण्यात अडथळे येत आहेत.

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक सुरू आहे. मात्र पक्षाच्या कार्यशैलीवर, हायकमांडच्या संस्कृतीवर आरोप केले जातात. त्यातून बाहेर पडण्यासाठी नव्या अध्यक्षांच्या कार्यकाळात काही बदल पाहायला मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे देखील वाचा