अमरावती : एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलेली ढाल आणि तलवार चिन्ह ही भारतीय जनता पक्षाची ढाल आणि विश्वासघाताची तलवार असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Leader of Opposition in the Legislative Council, Ambadas Danave) यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पक्षाचे नवे चिन्ह आणि नाव देण्यात आल्यानंतर ठाकरे गटाची पहिली बैठक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली अमरावती येथे झाली. यावेळी अमरावतीत उद्धव ठाकरे गटाने जोरदार ताकद दाखवली.
दरम्यान, अमरावतीतील राजकमल चौकात दानवे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने मशालीचे प्रतीक पेटवून रणशिंगही फुंकले. त्यानंतर जय भारत मंगल कार्यालयात ठाकरे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला.
यावेळी अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. शिंदे गटाची ढाल ही भारतीय जनता पक्षाची ढाल असून गद्दारांची तलवार शिंदे गटाच्या चिन्हावर आहे, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.
त्यामुळे आम्हाला मिळालेले प्रतीक म्हणजे क्रांतीची मशाल. या मशालीत पडणाऱ्या ठिणगीत विरोधक भस्मसात होणार आहेत, असेही दानवे यावेळी म्हणाले.