बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप, ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेतील नेत्यांवर गुन्हा दाखल

A case has been registered against the leaders of Thackeray group's Mahaprabodhan Yatra for making defamatory statements

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray | मुंबई : ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेतील नेत्यांवर ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुषमा अंधारे, विनायक राऊत भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांच्याविरुद्ध कलम 153, 500 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील टेंभीनाका येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाची महाप्रबोधन बैठक आयोजित करण्यात आली होती. मेळ्यातील भाषणात बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली. तर भास्कर जाधव यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांची नक्कल केली. बदनामी केल्याचा आरोप करत त्याच्यावर ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शिंदे गटाचे बाळा गवस यांनी फिर्याद दिली. या तक्रारीनुसार सर्व नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतना येथे रविवारी ठाकरे गटाच्या महाप्रबोधनयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सुषमा अंधारे, विनायक राऊत भास्कर जाधव, मधुकर देशमुख, अनिता बिर्जे यांची भाषणे झाली. यावेळी या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भडकाऊ आणि प्रक्षोभक वक्तव्य करून त्यांची प्रतिमा डागाळली.

यासह अन्य राजकीय नेत्यांबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाशी बोलताना अद्याप गुन्ह्याच्या अहवालाची प्रत मिळालेली नसल्याची माहिती दिली आहे.

महाप्रबोधन यात्रेच्या उद्घाटन सभेत वक्ते म्हणून स्वत: खासदार राजन विखारे, आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत आणि आमच्या अनिताताई बिर्जे यांच्यावर कलम 153 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे विविध प्रसारमाध्यमांमधून समजले.

मात्र, अजूनही माझ्याकडे रीतसर याची प्रत मिळालेली नाही. महाप्रबोधन यात्रेतील सगळी भाषणं पब्लिक डोमेनमध्ये आहेत. ती तपासून घेता येतील.

मला खात्री आहे, त्यातलं एकही वाक्य हे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही. कायदा माझ्या बापाने लिहिला आहे आणि त्याचा सन्मान राखणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे.

तरीसुद्धा 153 अ अर्थात चितावणीखोर वक्तव्य या सबबी खाली दाखल झालेला गुन्हा हा आमच्या महाप्रबोधन यात्रेच्या सुरुवातीचा शुभशकुन आहे असा आम्ही समजतो, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.