मुंबई : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तेव्हापासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (PFI) अब्दुल मतीन शेखानी यांने राज ठाकरेंना ‘छेडेंगे तो छोडेंगे नहीं’ असा इशारा दिला होता. मतीन शेखानी यास अखेर ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
मुंब्रा येथील सभेत बोलताना अब्दुल मतीन शेखानी यांनी मनसेला जाहीर इशारा दिला होता. त्यावेळी विनापरवाना जमाव जमवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तेव्हापासून मतीन शेखानी फरार होता. ठाणे न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत शेखानी यांस जामीन मंजूर केला आहे. शेखानीस १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मतीनचा मनसेला नेमका इशारा काय?
काही लोक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. काही लोकांना अजानची समस्या आहे. काही लोकांना भोंग्यांची समस्या आहे. काही लोकांना त्यांच्या मशिदी आणि मदरशांच्या समस्या आहेत.
मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे, आम्हाला शांतता हवी आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा एक नारा आहे की प्रत्येक मजदूर आमचा आहे. त्याचवेळी ‘हमको छेडो नहीं, हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नहीं’अशी आमची दुसरी घोषणा आहे.
जर तुम्ही मदरसा, मशीद, लाऊडस्पीकरला हात लावण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सर्वात पुढे दिसेल, असे पीएफआय नेते अब्दुल मतीन शेखानी यांनी इशारा दिला होता.
केंद्र सरकार राज ठाकरेंना सुरक्षा देणार?
राज ठाकरे यांनी मशिदींवरील शिंग हटवण्यासाठी ३ मे पर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. इतकंच नाही तर मशिदींवरील भोंगे काढली नाहीत, तर राज ठाकरेंनी मनसैनिकांना लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याचा आदेश दिला आहे.
त्यावेळी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (PFI) ‘आम्हाला छेडले तर आम्ही सोडणार नाही’, असा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्याची शक्यता आहे.