मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कोणाला मिळणार? यावरून मोठा गदारोळ सुरु आहे. हे मैदान कोणाला देणार या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
अखेर न्यायालयाने शिवसेनेला परवानगी दिली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देत प्रकरण निकाली काढले आहे.
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळतानाच न्यायालयाने मुंबई महापालिकेचा दावाही फेटाळून लावला आहे. त्यामुळे यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे.
आता या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाने न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्याची आज सुनावणी झाली. शिवसेनेकडून अधिवक्ता एसपी चिनॉय आणि मुंबई महापालिकेतर्फे अधिवक्ता मिलिंद साठ्ये यांनी युक्तिवाद केला. शिंदे गटाच्या वकिलांनीही यावेळी जोरदार युक्तिवाद केला.
सुमारे चार तास हा युक्तिवाद चालला. यावेळी न्यायालयाने अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. खरी शिवसेना कोणाची आहे, त्या वादात आम्हाला पडायचे नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
तसेच शिवसेनेला यापूर्वी दसरा मेळाव्याला परवानगी मिळाली होती, असे सांगतानाच दोन्ही गटांचे अर्ज फेटाळण्याचा पालिकेचा निर्णय योग्य असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
दसरा मेळावा हा शिवसेनेचा इतिहास
कोरोनाच्या काळात आम्ही शिवाजी पार्क मैदानावर मेळावा घेतला नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचा इतिहास आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कोण हा मुद्दा येथे नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर होतो.
त्यामुळे आम्हाला परवानगी द्यावी लागेल. शिवसेनेचे वकील एसपी चिनॉय यांनी न्यायालयाला सांगितले की, उद्या कोणी वैयक्तिकरित्या येऊन परवानगी मागितली तर ते योग्य नाही.
कोणी मैदानासाठी अर्ज करू शकेल का? असा सवाल न्यायालयाने यावेळी केला. शिवसेनेच्या वकिलाने उत्तर दिले की होय, मैदानासाठी कोणीही अर्ज करू शकतो.
यापूर्वी मनसेनेही शिवाजी पार्कसाठी परवानगी घेण्याचा प्रयत्न केला होती, याकडे शिवसेनेच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
शिवाजी पार्कच्या जागेची मागणी आम्ही यापूर्वीच केली आहे. शिवाजी पार्क मैदानासाठी प्रथम कोणी अर्ज केला? असा सवाल न्यायालयाने केला. त्यासाठी आम्ही पहिल्यांदा अर्ज केला. आम्ही 22 आणि 26 ऑगस्टला अर्ज केला.
शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी 30 ऑगस्ट रोजी अर्ज केल्याचे शिवसेनेच्या वकिलांनी सांगितले. तसेच शिंदे गटाची याचिका फेटाळण्याची मागणी केली.
यावेळी मुंबई महापालिकेच्या वकिलांनीही जोरदार युक्तिवाद केला. शिंदे गट आणि शिवसेनेला मैदान मिळवण्याचा अधिकार नाही. हे मैदान महापालिकेच्या ताब्यात आहे. तसेच हे मैदान सायलेन्स झोनमध्ये येते.
त्यामुळे हे मैदान कोणालाही देता येणार नाही. मैदानाची परवानगी नाकारून कोणाच्याही हक्कावर गदा आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे महापालिकेच्या वकिलांनी सांगितले.
पोलिसांनीही आम्हाला अहवाल दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर हे मैदान कोणालाही देऊ नये, असे पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटले आहे, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.