मुंबई : 40 डोक्याच्या रावणाने रामाचे धनुष्य-बाण गोठवले. केवळ रक्त गोठलेले लोकच असे करू शकतात. उलट्या काळजाच्या लोकांनी आईच्या काळजात कट्यार खुपसला.
ज्या शिवसेनेने त्यांना उभे केले, त्याच शिवसेनेचा घात केला. कारस्थानकर्त्यांनी बाळासाहेबांचे धनुष्यबाण गोठवले. धनुष्यबाण गोठल्यानं आता महाशक्तीला खूप आनंद होईल, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ गोठवण्याचा अंतरिम निर्णय घेतला असून या दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही.
आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालाची आम्हाला अपेक्षा नव्हती. मात्र शिवसेना संकटाला घाबरत नाही. शिवसेना एकसंध उभी राहील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे म्हणाले
- त्या ४० जणांचा वापर झाला की फेकून देतील.
- निष्ठा ही विकत घेता येत नसते, हे परवाच्या मेळाव्यात दिसले.
- तुमचा हेतू शिवसेना संपवण्याचा आहे.
- मिंधे गटाचा भाजप पुरेपुर वापर करत आहे.
- काँग्रेसनेही शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही.
- तुमची बुद्धी गोठली नसेल तर, बाळासाहेबांचं नाव वापरु नका.