मुंबई, 13 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन वर्षांनंतर आज मंत्रालयात दाखल झाले. कोविड-19 संसर्ग आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे ते गेल्या दोन वर्षांपासून मंत्रालयात येऊ शकले नाहीत.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपला प्रवासही कमी केला होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला आणि सह्याद्री अतिथीगृहातून राज्याची प्रशासकीय कामे केली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्रालयात झालेल्या बैठकांनाही मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली.
प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अचानक मंत्रालयात दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अचानक मंत्रालयात आल्याने प्रशासकीय कर्मचाऱ्यांची तळमजल्यावरून मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर धावपळ सुरू झाली.
मंत्रालयातील सुरक्षा रक्षकांनाही सतर्क करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंत्रालयात आगमन होताच मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयातून राज्य सरकार आणि प्रशासनाचा कारभार सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयातील विविध विभागांना भेटी देऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा करून सूचनाही दिल्या. मंत्रालयात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनीही भेटीवर आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली कळकळ आणि प्रत्यक्ष कामाबद्दल केलेल्या सूचनांमुळे प्रोत्साहन मिळाल्याचे गृह विभागाचे कर्मचारी अश्विनी राम धवणे यांनी सांगितले. याच विभागातील प्रगती विकास मोरे यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
कर्मचाऱ्यांशी चर्चा
त्रिमूर्ती प्रांगणात प्रदर्शनाची तयारी पाहून मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली.
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त केलेल्या सजावटीचे त्यांनी कौतुक केले तसेच बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले. कर्मचाऱ्यांशीही बोलून त्यांच्या कामाची माहिती घेतली.
यानंतर मुख्यमंत्र्यांनी महसूल विभाग तसेच सामान्य प्रशासन विभाग, गृह विभाग, विधी व न्याय विभागाला भेट दिली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात येत नसल्याची टीका विरोधक सातत्याने करत होते. मात्र आता मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक असल्याने मंत्रालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी विविध विभागांना भेटी देऊन कर्मचाऱ्यांशी चर्चाही केली.