Trending News | देश विदेशातील 50 बातम्यांचा वेगवान आढावा

Regional Marathi News Bulletin | Quick review of top 10 news from home and abroad

Trending News | पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा मंगळवारी राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पुणे जिल्ह्यातल्या देहू इथं जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल.

संत चोखामेळा यांच्या अभंगगाथेचे प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या अभंगगाथेत साडे पाचशे अभंगांचा समावेश आहे. संत चोखामेळा यांच्या कुटुंबाचे सर्व अभंग एकत्र करून ही अभंगगाथा तयार करण्यात आली आहे.

आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात पंतप्रधान मुंबईत राजभवन इथं जलभूषण भवन आणि क्रांतीकारकांच्या गॅलरीचंही उद्धाटन करणार आहेत. मुंबई समाचार या वृत्तपत्राच्या द्विशताब्दी महोत्सवालाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.

****

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीत गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गांधी यांना दोन जूनपासून कोविडचा संसर्ग झालेला आहे.

या दरम्यान अस्वास्थ्यामुळे त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याचं, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सांगितलं आहे.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय – ईडीने सोनिया गांधी यांना ८ जूनला चौकशीसाठी बोलावलं होतं, पण कोविडग्रस्त झाल्यानं, त्या चौकशीसाठी हजर राहू शकल्या नाहीत.

दरम्यान, पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांना काल रात्री उशिरा रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे.

छातीत दुखत असल्याच्या तक्रारीमुळे बादल यांना आठवडाभरात दुसऱ्यांदा इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे. ९४ वर्षीय बादल यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अकाली दलाच्या पक्ष प्रवक्त्यांनी दिली.

****

देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या १९५ कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली.

देश लवकरच २०० कोटी लसीकरणाच्या उद्दीष्टाकडे वेगानं मार्गक्रमण करत असल्याचं मांडवीय म्हणाले. सामुहिक प्रयत्नांमुळेच एवढ्या मोठ्या संख्येत नागरिकांना कोविडपासून सुरक्षा कवच देऊ शकल्याचं मांडवीय यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

वीज महावितरण कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांत तब्बल ५५७ दशलक्ष युनिट विजेची चोरी उघडकीस आणली. उच्च आणि लघुदाब वर्गवारीमध्ये २२ हजार ९८७ ठिकाणी ३१७ कोटी ४५ लाख रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत.

त्यापैकी १७२ कोटी ४५ लाख रुपयांची वसुली झाली आहे. सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या या विक्रमी कामगीरीमुळे महावितरणची वीजहानी कमी करण्यासोबत महसुलामध्ये वाढ होण्यासाठी मदत होत आहे.

वीज गळती कमी करण्यासाठी विभागीय स्तरावरील भरारी पथकांच्या माध्यमातून ही मोहीम अधिक प्रखरपणे राबवण्यात येत असल्याचं, महावितरणकडून सांगण्यात आलं.

****

धनगर समाजाच्या महामंडळासाठी भरीव तरतूदीची राज्य सरकारची घोषणा पोकळ घोषणा ठरली असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने बीड इथं भारतीय संग्राम परिषदेच्या सत्कार सोहळ्यात दरेकर बोलत होते.

परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यावेळी उपस्थित होते. धनगर समाजातील वंचित, होतकरू, गरजुंना या सरकारने मदत करणं अपेक्षित आहे.

हे युवक विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत असताना, सरकारने त्यांना पाठबळ देणं गरजेच असताना, सरकार फक्त तोंडाला पान पुसण्याचं काम करतं, मात्र या तरुणांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम संग्राम परिषदेच्या माध्यमातून विनायक मेटे करत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख दरेकर यांनी केला.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज वीज पडून दोन तरुणांचा मृत्यू झाला. फुलंब्री तालुक्यात सताळ पिंप्री इथं ही दुर्घटना घडली. जिल्ह्याच्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीच्या कामांची लगबग सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे.

****

जालना शहरासह तालुक्यातल्या अनेक भागात आज दुपारी चार वाजेच्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं शहरातल्या सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय झाली.

जिल्ह्याच्या भोकदरन आणि जाफराबाद तालुक्यातल्या काही भागातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात काल रात्री अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटात मेघगर्जनेसह पाऊस झाला. जिल्ह्यातल्या कंधार, लोहा, कापसी, कलंबर, माळाकोळी, देगलूर, मूखेड, हिमायतनगर, किनवट, मुदखेड, माहूर, अर्धापूर आणि नांदेड इथं पावसाने हजेरी लावली.

हिमायतनगर इथ एका ३० वर्षे वयाचा शेतकरी शेतातून घरी जात असतांना झाडावर वीज कोसळली, त्यात या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर हिमायतनगर मध्ये एक जनावर दगावलं. लोहा तालुक्यात माळेगाव आणि डोंगरगाव इथं दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडल्यामुळे एकूण ६ जनावर दगावली आहेत

****

जालना शहरालगत पर्यावरण पूरक वातावरण निर्मितीसह पर्यटनक्षेत्र विकसित करण्यासाठी समस्त महाजन ट्रॅस्ट मुंबई आणि जालन्यातल्या विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्यानं अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या टप्पा तीन परिसरातल्या पारशी टेकडीवर ६५ हजार वृक्ष लावगडीचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते झाला.

या परिसरात वृक्ष लागवडीच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होण्याबरोबरच जालनावासीयांसाठी एक पर्यटनस्थळ विकसित होणार असल्यान या उपक्रमात प्रत्येकानं सहभाग नोंदवण्याचं आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी केलं. वृक्ष लागवडीच्या या उपक्रमात जालनेकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला

****

नांदेड जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. एकूण २ हजार ९०९ शाळांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा तालुका स्तरावर करण्यात आला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड इथं सापडलेल्या बॉम्बप्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी आज एकास अटक केली. रामेश्वर मोकासे असं त्याचं नाव असून त्याचा मित्र दिनेश राजगुरू याचकडे मागील दोन वर्षांपासून थकलेली रक्कम परत मिळाण्यासाठी त्यानं हा बॉम्ब राजगुरु यांच्या दुकानासमोर ठेवला होता. मोकासे याला १६ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

****

फ्रान्समध्ये झालेल्या दिव्यांगांच्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताची दिव्यांग नेमबाज अवनी लाखरा हिनं दुसरं सुवर्णपदक मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं अभिनंदन केलं आहे.

देशाला अवनीचा अभिमान आहे. आपली कामगिरी नव्या उंचीवर नेण्यासाठीची तिची एकाग्रता कौतुकास्पद असं पंतप्रधानांनी ट्वीटर संदेशात म्हटलं आहे.

अवनीनं काल महिलांच्या ५० मीटर ३ पोझिशन रायफल एसएच वन प्रकारात स्लोव्हाकियाच्या वेरॉनिका वादोविकोव्ह हिला पराभूत करत स्पर्धेतलं दुसरं सुवर्णपदक जिंकलं होतं.

****

मॅक्सिकोत झालेल्या भारोत्तोलन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आकांक्षा व्यवहारे हिने रौप्यपदक पटकावलं आहे. आकांक्षाने चाळीस किलो वजनी गटात स्नॅच प्रकारात ५९ किलो तर जर्क प्रकारात ६८ किलो, असं एकूण १२७ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावलं. क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी आकांक्षाचं अभिनंदन केलं आहे.

****

खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धा मध्ये, ३७ सुवर्ण, ३४ रौप्य आणि २९ कांस्यपदकांसह पदक तालिकेत महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत १०० पदकांची कमाई केली आहे.

तर हरियाणा ३६ सुवर्ण, ३३ रौप्य आणि ३९ कांस्य पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. हरियाणाने १०८ पदकांची कमाई केली आहे. २१ सुवर्ण, १३ रौप्य आणि १८ कांस्य पदकांसह कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे.

****

फ्रान्समध्ये नॅन्सी इथं होणाऱ्या कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेसाठी दिल्लीची अनाहत सिंग भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे.

अनाहतसिंग १४ वर्षांची असून, या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करणारी ती सर्वांत लहान खेळाडू ठरली आहे. महाराष्ट्राच्या ऐश्वर्या खुबचंदानीचा ३-० असा पराभव करून अनाहत सिंग या स्पर्धेसाठी पात्र ठरली.

****

सरकारच्या गेल्या आठ वर्षांच्या काळात महिला उद्योजकांनी सुरु केलेल्या जैवतंत्रज्ञान कंपन्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. नवी दिल्लीत प्रगती मैदानात झालेल्या जैवतंत्रज्ञान स्टार्टअप प्रदर्शनाला संबोधित करताना काल ते बोलत होते.

****

दिव्यांग नेमबाज अवनी लाखरा हिनं विश्वचषक स्पर्धेत दुसरं सुवर्णपदक मिळवलं आहे. महिलांच्या ५० मीटर ३ पोझिशन रायफलमध्ये ही कामगिरी केली. या कामगिरी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी तिचं अभिनंदन केलं आहे.

****

नव्यानं स्थापन एचएनएससी समूह विद्यापीठाच्या पहिल्या विशेष दीक्षांत समारंभात काल ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी राज्यपाल कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन इथं काल देण्यात आली. रतन टाटा हे नव्या उद्योजकांसाठी दीपस्तंभ असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी काढले.

****

एफआयएच हॉकी प्रो-लीग स्पर्धेत भारताच्या पुरुषांच्या संघानं बेल्जियमचा ५-४ असा पराभव केला.शेवटच्या आठ मिनिटांमध्ये भारतानं बाजी पालटून थरारकरित्या विजय मिळवला. बेल्जियमधल्या अँटवर्प इथं ही स्पर्धा सुरू आहे.

****

अकोला शहरापासून २३ किलोमीटर अंतरावर जिल्ह्यातील बार्शीटाकळी जवळ काल संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ३ पूर्णांक ५० इतकी या भूकंपाच्या तीव्रतेची नोंद झाली आहे. या भूकंपामुळे जीवित अथवा मालमत्तेची कोणतीही हानी झाली नाही.

****

अर्थ मंत्रालयाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत आयोजित केलेल्या आयकॉनिक सप्ताहाचा आज गोव्यात समारोप होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते राष्ट्रीय सीमा शुल्क आणि जीएसटी संग्रहालय ‘धरोहर’चं लोकार्पण होणार आहे.

****

राज्यसभा निवडणूक निकालाचा फारसा धक्का बसला नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीबाबतही भाष्य केलं.

सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजूकडे आवश्यक संख्याबळ नव्हतं, आम्हाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपला यश आलं, असं पवार म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक तर शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल विजयी झाले आहेत.

****

माहिती अधिकार कायद्यांर्गत येणाऱ्या अपीलांना निकाली काढण्यात वाढ झाल्याबद्दल केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केंद्रीय माहिती आयोगाचं कौतुक केलं आहे. माहिती आयुक्तांच्या राष्ट्रीय परिषदेच्या चौदाव्या विशेष सर्वसाधारण बैठकीत ते नवी दिल्ली इथं बोलत होते.

गेल्या वर्षीच्या सुमारे चाळीस हजार खटल्यांवरून प्रलंबित प्रकरणं २७ हजारांवर आली आहेत, तर प्रकरणांचा निपटारा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ७० टक्क्यांनी वाढला आहे, असं बैठकीला संबोधित करताना डॉ. सिंह म्हणाले. लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व पावलं उचलली जातील, असं त्यांनी नमूद केलं.

२०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून पारदर्शकता, जबाबदारी आणि नागरिक-केंद्रीत दृष्टिकोन हे शासनाच्या मॉडेलचे वैशिष्ट्य बनलं आहे. या केंद्र सरकारच्या काळातच आरटीआय अर्जांच्या ई-फायलिंगसाठी २४ तास पोर्टल सेवा सुरू करण्यात आली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १९४ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १६ लाख २८ हजार ४१९ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९४ कोटी ९२ लाख ७१ हजार ४११ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या आठ हजार ३२९ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली, दहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चार हजार २१६ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ४० हजार ३७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

व्यापाऱ्यांसमोर असलेल्या इ-कॉमर्स आणि ऑनलाईन व्यापाराच्या स्पर्धेला आव्हान देण्यासाठी महाराष्ट्र व्यापार संघटनेनं पावलं उचलली आहेत.

परकीय इ-कॉमर्स कंपन्यांना पर्याय म्हणून महाराष्ट्र व्यापार संघटना आता स्वतःचं आत्मनिर्भर अॅप विकसित करत आहे. हे अॅप या वर्षाच्या अखेरपर्यंत सर्वसामान्य ग्राहकांसाठी खुलं होईल अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

****

राज्यभरातल्या २१६ नगरपरिषदा तसंच नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगानं १५ ते २१ जून या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगानं काल मुंबईत केली. २०८ नगरपरिषदा आणि आठ नगरपंचायतींची आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नगर परिषदांच्या सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत येत्या १३ तारखेला काढण्यात येणार आहे. संबंधित तहसील आणि नगर परिषद कार्यालयात संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली दुपारी १२ वाजेपासून सभा आयोजित करण्यात येणार आहेत.

****

सुवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात सर्व मंडळ स्तरावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने विस्तारित समाधान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरांच्या माध्यमातून सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी यांचे स्टॉल्स लावून नागरिकांच्या समस्यांचं तात्काळ निराकरण करण्यात येत आहे.

या शिबिरांमध्ये उपस्थिती लावून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रशासकीय अडचणी तातडीने सोडवत आहेत. विविध विभागाच्या लाभार्थ्यांना लाभांचं थेट वाटप करण्यात येत आहे.

आखाडा बाळापूर इथं काल पार पडलेल्या समाधान शिबिरात जितेंद्र पापळकर यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रशासन आपल्या दारी असल्याचा विश्वास नागरिकांना दिला.

****

जकार्ता इथं सुरु असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला आणि पुरुष एकेरीत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत, पी.व्ही. सिंधूला तैपेईच्या खेळाडुकडून १२-२१, १०-२१ असा, पुरुष एकेरीत लक्ष्य सेनला चायनीज तैपेईच्या खेळाडुकडून १६-२१, २१-१२, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला.