मुंबई : निवडणूक आयोगाने अखेर शिंदे गट आणि ठाकरे गटाची दोन नावे दिली आहेत. शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले आहे.
ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव पडले आहे. त्याशिवाय ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाम ही काफी हैं
“उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव पुरेसं आहे. मशाल चिन्ह मिळाल्याचा आनंद आहे,” सुषमा अंधारे म्हणाल्या. अन्याय, अत्याचार, कुटील राजकारण, षड्यंत्रकारांविरुद्ध ही मशाल धगधगत राहील, असे अंधारे म्हणाल्या.
एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाल्या?
सुषमा अंधारे म्हणाल्या की, गरिबांच्या झोपडपट्ट्यांमधील अंधार दूर करण्यासाठी आणि अन्याय दूर करण्यासाठी ही मशाल कायम तेवत राहणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळाले. त्यावर उत्तर देताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.
त्यांना खेळवलं जातय
गेल्या अडीच महिन्यांपासून ते बालहट्ट चालवला आहेत. उद्या मी उद्धव ठाकरे आहे, असेही ते म्हणू शकतात. त्यांनी अद्याप तसे सांगितले नाही. कारण ते कोणत्याही नावावर, कशावरही दावा करू शकतात.
त्यांना खेळवले जात आहे, शिंदेंपेक्षा मी भाजपबद्दल जास्त बोलेन, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. भाजप जे राजकारण करू पाहत आहे. त्यांना शिवसेनेचे नाव पुसून टाकायचे आहे पण भाजपच्या दहा पिढ्याही ते करू शकणार नाहीत, असं अंधारे म्हणाल्या.