लातूर : जिल्ह्यात यंदा जादा उसाची मोठी समस्या आहे. सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कारखाना ऊस नेत नाही आणि मजूर लुटल्याशिवाय रहात नाही अशा दुहेरी संकटाचा सामना करीत आहे.
अतिरिक्त ऊस कारखान्यात लवकर नेत नाही आणि मजुरांकडून होणारी लूटही थांबता थांबत नाही अशा दुहेरी चक्रात शेतकरी अडकला आहे. मजुरांच्या टोळ्या विविध प्रकारची अडवणूक करीत आहेत.
दरम्यान, कारखान्याचा सभासद असेल तरच ऊस वाहून नेण्याचा फतवा कारखानदारांनी काढला आहे. परिणामी शेतकरी हतबल झाला आहे.
लातूर जिल्हा हा सततच्या दुष्काळासाठी ओळखला जातो. एकीकडे जिल्ह्यात उसाचे क्षेत्र कमालीचे वाढले आहे. यंदा जादा उसाची मोठी समस्या आहे.
अनेकांचा ऊस गेल्या 16-18 महिन्यांपासून फडात उभा आहे. ऊसाला तुरे आलेले आहेत. आता शेतकरी कारखान्याचे उंबरे झिजवतोय. नेत्यांच्या पाया पडतोय, तर दुसरीकडे फडात मजूर आला तर त्याची हांजीहांजी करतोय.
साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांना ऊस तोड चिट्ठी दिली असली तरी कष्टकरी शेतकऱ्यांनी मजूर अतिरिक्त 9 ते 10 हजार रुपये, बोकड, दारू अशा विविध मागण्या करीत आहेत. यासोबतच ट्रॅक्टरच्या एका ट्रिपसाठी 1000 रुपये उकळले जात आहेत.
शेतकऱ्यांनी ही बाब कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यास तडजोड करा, अन्यथा ऊस तसेच शिवारात पडून राहील असे उलट शेतकऱ्यांना कारखान्याकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात भरडला जात आहे.