मुंबई : शिवसेनेच्या खासदारांची आज बोलावलेली बैठक संपली असून पाच खासदारांनी ‘दांडी’ मारल्याचे स्पष्ट झाले आहे. हे पाच खासदार एकनाथ शिंदे गटात सामील होणार का, यावर आता चर्चा सुरू आहे.
दरम्यान, शिवसेना खासदारांची मातोश्रीवर पाच तास बैठक झाली, ज्यामध्ये एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा कोणताही ठोस निर्णय झाला नाही.
आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदारही नाराज झाल्याच्या अफवा पसरल्या. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना खासदारांची बैठक बोलावली होती. ही बैठक सुमारे पाच तास चालली.
यातून काय मार्ग निघणार, उद्धव ठाकरे खासदारांची नाराजी दूर करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा, अशी भूमिका काही खासदारांनी घेतल्याचे कळते.
यासंदर्भात खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते. त्यावर आज चर्चा झाली असली तरी द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देण्याबाबत आज कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.
शिवसेनेचे अनुपस्थित खासदार
1. यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
2. परभणी – संजय जाधव
3. हिंगोली – हेमंत पाटील
4. कल्याण-डोंबिवली – श्रीकांत शिंदे
5. रामटेक – कृपाल तुमाने
अनुपस्थित खासदारांमध्ये कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचाही समावेश आहे, पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने मी दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही, असे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
दरम्यान, द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यायचा की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नसून, शिवसेनेच्या खासदारांचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार असल्याचे कळते. त्यानंतर शिवसेनेने द्रौपदी मुर्मूला पाठिंबा दिल्यास त्या मातोश्रीवर आभार मानायला येऊ शकतात.