मुंबई : शिवसेनेचे 39 वे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हेही बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. आज सकाळपासून संपर्कात नसलेले सामंत दुपारी गुवाहाटीला रवाना झाल्याचे वृत्त आहे.
त्यामुळे सामंत आणि शिंदे यांच्या अपक्षांसह आमदारांची संख्या 46 वर गेली आहे. तसेच आता शिवसेना नेते संजय राऊत यांचे सख्खे बंधू आमदार सुनील राऊत हेही गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. मातोश्री आणि शिवसेना सर्व बंडखोरांचे दरवाजे कायमचे बंद झाल्याचा दावा करत आहेत.
मात्र आता त्यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याने शिवसेनेत घरातच फूट पडली का? असा प्रश्न विचारला जात आहे.
मात्र त्याचवेळी संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले असून सुनील राऊत अजूनही मुंबईतच असल्याचे म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, सुनील राऊत सध्या मुंबईत असून त्यांची कांजूरमार्ग येथे सभा व बैठक सुरू आहे.
मी व माझे कुटुंब मेले तरी आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी बेईमान होणार नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपद न मिळाल्याने सुनील राऊत नाराज असल्याचे वृत्त आहे.
त्यानंतर ते आज थेट शिंदे गटात दाखल होणार असल्याचे वृत्त आहे. त्यांना त्यांच्या मनातील वेदना दाखवायची आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.