Eknath Shinde-Jogendra Kawade Alliance : गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट आणि प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष यांच्यात युती होणार असल्याची चर्चा आहे. असे संकेतही वरिष्ठ पातळीवरून अनेकवेळा देण्यात आले आहेत.
एकीकडे ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होणार असल्याची चर्चा असली तरी दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पीपल्स रिपब्लिकन पक्षासोबत युती करण्याची घोषणा केली आहे. यानिमित्ताने शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचे कौतुक
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पक्ष यांच्यातील युतीची घोषणा करण्यात आली.
या पत्रकार परिषदेत जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. राज्याला धाडसी मुख्यमंत्री लाभला आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल लोकांच्या मनात चांगली भावना आहे.
शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक धाडसी निर्णय घेतले. या धाडसी निर्णयामुळे प्रभावित होऊनच बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचे कवाडे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले?
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जोगेंद्र कवाडे यांचे कौतुक केले आहे. कवाडे यांचे पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत.
आम्ही दोघेही संघर्षातून आलो आहोत. आता सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. राज्याच्या हितासाठी आम्ही एकत्र येत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.